देवळी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्य कार्यकारिणीची सभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत देवळी येथे पार पडली. या सभेत हिमाचल प्रदेश, झारखंड व बिहारच्या धर्तीवर राज्यातील तेली जातीला आरक्षण द्यावे यासह नऊ ठराव पारित करण्यात आले. या बैठकीला कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजू नाना शेलार, सहसचिव बळवंत मोरघरे, माजी आमदार चरण वाघमारे, उपाध्यक्ष संजय विभुते, राज्य समन्वयक सुनील चौधरी, उपाध्यक्ष बबन चौधरी, सेवाआघाडीचे राज्य अध्यक्ष माधव शेजुळ, अकोलाचे विभागीय अध्यक्ष विष्णुपंत मेहर, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, अमरावती विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते. या बैठकीला राज्याच्या विविध जिल्ह्यांतून ५१५ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यव्यापी समाज मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय समाजाच्या विविध बाबींवर अनेकांनी मत नोंदविले.