वेदोक्ताचा अधिकार राखीव कशासाठी ?

सौ. सीमा. बोके,  अंजनगाव सुर्जी,

     स्त्रियांना धर्माच्या आणि धार्मिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कित्येक महापुरुषांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. संविधानाने स्त्रियांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य व अधिकार दिले परंतु आता परत देशाची वाटचाल गुलामगिरीकडे सुरू आहे. जात आणि धर्माच्या नावावर लोकांना पेटवून समाजात तेढ निर्माण केल्या जात आहे.

    नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात नुकतीच एक माणुसकीला का फासणारी घटना घडली. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील युवराज्ञी संयोगिताराजे भोसले या पूजाविधीसाठी काळाराम मंदिरात गेल्या असता त्यांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाकारून त्यांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे ब्राह्मण पुजारी आणि त्यांच्यात वाद झाला आणि संयोगिताराजे तिथून निघून गेल्या. हे प्रकरण सहज घेण्याजोगे नाही. या प्रकरणाचा खोलवर विचार केला, तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ३५० वर्षांपूर्वी जे घडले तसेच आज विज्ञान युगात घडत आहे. आधार घेऊन शिवरायांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला होता. त्यानंतर म्हणजे आजपासून जवळपास सव्वाशे वर्षांआधी राजर्षी शाहू महाराजांसोबत जे वेदोक्त प्रकरण घडले ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांना वेदोक्त मंत्र नाकारण्यात आले होते. तोच प्रकार आज युवराज्ञी संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत घडला. व्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी घडलेला प्रकार एकच आहे आणि तो एकाच विशिष्ट वर्गाकडून घडलेला आहे.

Why is Vedoktas right reserved   "वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्रातील हा फरक आहे की, वेदोक्त मंत्र हे केवळ ब्राह्मण लोकांसाठी म्हटले जातात, तर पुराणोक्त मंत्र हे ब्राह्मण सोडून इतर लोकांसाठी असतात. हा त्यांचा नियम; परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या वेळी कोल्हापूरच्या मंदिरातील पूजाऱ्यांचा पगार हा शाहू महाराजांकडून होत होता. तरीही त्यांना वेदोक्त मंत्र नाकारण्यात आले होते.

   छत्रपती शिवराय किंवा राजर्षी शाहू महाराजांच्या काळात सर्व विधी या धर्मग्रंथांनुसार चालत होत्या. त्यामुळे त्यावेळी फारसा विरोध कोणी करू शकत नव्हते; परंतु आज असे घडणे म्हणजे देशद्रोह आहे, असे आम्ही समजतो. देशद्रोह यासाठी की, आज देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो आणि संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांवर आज देशाची व्यवस्था चालत आहे; परंतु असा प्रकार घडणे म्हणजे हा संविधानाचा अपमान आहे आणि पर्यायाने तो संपूर्ण देशाचा अपमान आहे.

   आपला भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि या देशात एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी असणे हे अशोभनीय आहे. राजघराण्यातील एका युवराज्ञीचा अशा प्रकारे अपमान होत असेल, तर सामान्य लोकांसोबत हे पंडे पुजारी कसे वागत असतील, याची कल्पना आपण करू शकतो. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर अशा अनेक मोठमोठ्या मंदिरांतील चित्र आपण बघतो, की दर्शनासाठी आलेल्या रांगेतील लोकांना अक्षरशः हाताने हे पुजारी लोटून लावतात मग ती स्त्री असो वा पुरुष.

   अनेक मंदिरांत आजही स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात येतो. आजही शनि शिंगणापूर येथे महिलांना पूजा करण्यास मज्जाव आहे. स्त्रिया पूजा करू शकत नाहीत याचाच अर्थ स्त्रिया अपवित्र आहेत, असे हे पुरोहित मंडळी मानतात, कारण पूजा ही पवित्र असते आणि पवित्र काम करण्यास अपवित्र लोकांनाच मज्जाव राहील ना ! स्त्रियासुद्धा निमूटपणे लांबूनच शनिदेवाचे दर्शन घेतात. स्वतः अपवित्र आहे, असे मानून परत येतात. मुळात अपवित्र असण्याचे कारण काय, र रजोनिवृत्ती येते. म्हणजे मासिक पाळी आणि म्हणून त्यांना अपवित्र मानले जाते. ज्या नैसर्गिक प्रक्रियेशिवाय या सृष्टीवर पुरुषच काय कुठलाच जीव जन्म घेऊ शकत नाही, त्याच प्रक्रियेला अपवित्र मानण्यात हे धर्माचे ठेकेदार मोठी हुशारी समजतात.

   स्त्रीला गर्भ कसा राहतो हे आजच्या विज्ञानाच्या युगात कोणालाही सांगायची गरज नाही. ज्या रक्ताने स्त्री किंवा पुरुषाची निर्मिती होते, त्या रक्तालाच अपवित्र मानल्या जाते. म्हणजे स्वतःच्याच रक्ताशी केलेली ही बेईमानी होय. कोणत्याही देवतेचा किंवा ह्या पुजाऱ्यांचा जन्मदेखील स्त्रीच्याच गर्भातून झाला आहे ना ? शनिदेवाची माता छाया हीदेखील स्त्रीच होती. मग कोणत्याही स्त्रीला अपवित्र मानणे म्हणजेच स्वतःच्याच आईला अपवित्र मानून तिचा अपमान करणे होय. अशा गोष्टी मोडून काढायच्या असतील, तर यावर प्रथम स्त्रियांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. त्याशिवाय यांची मक्तेदारी आपण मोडून काढू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मंदिरात सत्याग्रह करून ते सर्वांसाठी खुले केले होते त्याच काळाराम मंदिरात आज एकविसाव्या शतकात ही घटना घडणे म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण वेळीच सावध झालो नाही, तर यानंतर या देशात हे प्रकार आपल्याला निरंतर पाहायला मिळतील. संविधानाची पायमल्ली तर सर्रास सुरूच आहे. संविधान जाळण्यापर्यंत या देशातील लोकांची मजल जाते, तर उद्या संविधान बदलून त्याजागी मनुस्मृती आणल्या गेली, तर आश्चर्य वाटू देऊ नये. स्त्रियांना धर्माच्या आणि धार्मिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कित्येक महापुरुषांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. संविधानाने स्त्रियांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य व अधिकार दिले; परंतु आता परत देशाची वाटचाल गुलामगिरीकडे सुरू आहे. जात आणि धर्माच्या नावावर लोकांना पेटवून समाजात तेढ निर्माण केल्या जात आहे. आपण मात्र या लोकांची खेळी न ओळखता आपसातच भांडत आहोत. माता-पित्यावर प्रेम करणारा आज्ञाधारी राम, बंधुप्रेम, पत्नीप्रेम आणि आपल्या सेवकावरही अतूट प्रेम करणारा पुरुषोत्तम राम हा आज धर्माच्या बंधनात कसा अडकवल्या जात आहे आणि रामाच्या नावावर धर्माचा अघोरी खेळ कसा सुरू आहे हे आपण पाहतच आहोत. आपण अजूनही या मनुवाद्यांचे षड्यंत्र ओळखले नाही, तर इथून पुढे गुलामीचे जीवन जगण्यास तयार राहावे लागेल असे म्हणायला हरकत नाही. या गोष्टीची सर्वात जास्त झळ स्त्रियांना सोसावी लागेल. परत कुठल्या तरी धर्मग्रंथात 'पशू, शूद्र और नारी ये तो है ताडन के अधिकारी' हे वाचायला मिळणार....

सौ. सीमा. बोके,  अंजनगाव सुर्जी,  मो. नं.: 9325392434

Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209