पुणे - 'गांधी विचार दर्शन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. गांधी स्वतःवर प्रयोग करणारे व्यक्ती होते. गांधी हे भारतीयत्वाचा अर्क आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी घडवत आणली. त्यामुळे त्यांच्यात आश्वासकता आहे. त्याची मुळे भारतीय संस्कृतीत आहेत. सर्वसमावेशक राष्ट्रवाद त्यांनी आणला. आधुनिक भारत हे गांधीजींचे स्वप्न होते,' असे मत 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' आणि 'युवक क्रांती दला'तर्फे 'गांधी विचार दर्शन' ही एक दिवसीय कार्यशाळा झाली होती. त्या वेळी ते बोलत होते. गांधीभवनमध्ये झालेल्या या कार्यशाळेला राज्यघटना तज्ज्ञ डॉ. उल्हास बापट, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सप्तर्षी म्हणाले, 'गांधीजीची ११ व्रते अनुकरणीय आहेत. विषमता, शोषणामुळे, सामाजिक उतरंडीमुळे भारतात गरिबी आली, हे गांधींजींच्या ध्यानी आले. गांधीजींची थोरवी जगाने मान्य केली; मात्र पुण्याने आणि पुण्यातील एका समुदायाने मान्य केली नाही. पाहिजे तसा इतिहास पुस्तकात बदलला, तरी प्रत्यक्ष इतिहास बदलत नाही. हे खोट्या जमातीला सांगण्याची गरज आहे,' असे सांगून त्यांनी गांधींच्या व्रतांचे विश्लेषण केले. गांधी भवनच्या पुढाकाराने दर महिन्याला 'गांधी विचार दर्शन' शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले. आवटे यांनी मार्गदर्शन केले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. सुदर्शन चखाले यांनी सूत्रसंचालन केले.