परळी - जग कितीही आधुनिक होऊ द्या. कुणब्याशिवाय ते शून्य आहे. कलेक्टर शिवाय या देशाची व्यवस्था चालू शकते. पंतप्रधानांशिवाय चालू शकते. मंत्र्याशिवाय चालू शकते. अधिकाऱ्याशिवाय चालू शकते. पण या देशामधला कुणबी म्हणजेच शेतकरी असा घटक आहे. त्याच्याशिवाय या देशाचं पान सुद्धा हलत नाही. एवढी मोठी ताकद शेतकऱ्याची आहे आणि ही ताकद शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनी जागृत झाले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. बालाजी जाधव यांनी केले. धारूर तालुक्यातील कानपूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी कीर्तन म होत्सवात ते बोलत होते.
डॉ. जाधव म्हणाले की, कधीतरी इडीवाल्याना पाठवा. आमच्या शेतकऱ्यांकडे पाचशे दहा किलोचा कांदा विकल्यानंतर दोन रुपये घरी घेऊन जाताना कसं वाटतं. पाठवा इडी वाल्यांना याची कुठेतरी नोंद करा गिनीज बुकात पाचशे दहा किलो कांदा विकला तर दोन रुपये मिळतात. एवढी करप्ट व्यवस्था या देशात निर्माण झाली आहे.
एका दाण्याचे १०० दाणे करणारा कुणबी ताकद विसरला. त्याची जाणीव संत तुकाराम महाराजांनी करून दिली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा मला तू कुणबी केलास. तात्कालीन व्यवस्थेला संत तुकाराम महाराजांनी हिणवलं व झुकवलं. आज संत तुकारामांचा, संत नामदेवांचा, संत ज्ञानेश्वरांचा आदर्श घेऊन या व्यवस्थेला झुकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण कुणबी आहोत हे कधीच विसरू नका. कुणबी म्हणजे एक विशिष्ट जात नव्हे. बीज पेरण्यापासून बीज बाजारात विकण्यापर्यंत ज्या ज्या समूहाचे हात लागतात. ते समूह म्हणजे कुणबी. आज भांडवली व्यवस्थतेत सांगायचं म्हटलं तर कुणबी हा एक वर्ग आहे. या समस्त कुणब्यांना, अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करावे लागेल. आपल्या हक्क अधिकारासाठी लढावे लागेल. हेच आपल्याला संत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगत आहेत, असेही डॉ. बालाजी जाधव प्रवचनादरम्यान म्हणाले.
शेतकरी कीर्तन महोत्सवाने गावागावातील सामाजिक ऐक्याची भावना बळकट होत आहे. सोमवारी (ता. सहा) परळी तालुक्यातील कावळ्याचीवाडी व बोधेगावच्या शेतक-यांनी कीर्तन महोत्सवासाठी भाकरी पाठविण्याचा संकल्प केला होता. घराघरात होळीचा सण साजरा होत असताना कीर्तन महोत्सवातल्या वारकऱ्यांसाठी भाविकांनी पाठविलेल्या पुरण पोळ्यांनी वारकरी तृप्त झाले. महाराष्ट्रामध्ये एक आगळा-वेगळा संदेश चौदा गावांनी मिळून आयोजित केलेल्या या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून जात आहे.
धारूर तालुक्यातील कानपूर येथे ३ मार्चपासून शेतकरी कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजेच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधन व्हावे यासाठी परळी वैजनाथ व धारूर तालुक्यातील १४ गावांनी एकत्रित येऊन भव्य अशा शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवात देणग्या, पंक्ती, महाराजांची मोठमोठी बिदागी, अन्नदानातील धबकेबाजपणा टाळून एक आदर्श निर्माण केला आहे तर कीर्तनकारांनी प्रवासाचे अंतर लक्षात घेऊन मिळेल ते मानधन स्वीकारण्याचा एक आगळावेगळा पायंडा या कीर्तन महोत्सवात पडला आहे. या कीर्तन महोत्सवात वैचारिक प्रबोधनाची परंपरा पुनर्जीवित होत आहे. शेतकरी कीर्तन महोत्सव एक क्रांतीची पायवाट होत आहे. अशी भावना लोकसहभाग पाहून या कीर्तन महोत्सवाचे समन्वयक अॅड. अजय ब्रांडे यांनी व्यक्त केली आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan