नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले. पण, कीर सावरकरवादी होते. सावरकर भक्त आणि गांधी विरोधक असल्याने त्यांनी नको त्या ठिकाणी गांधींचा अवमान आणि सावरकर स्तुती केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या चरित्रात नको तेथे महात्मा गांधी यांचा उल्लेख केला. हा चरित्रग्रंथ वाचून बौद्ध समाजामध्ये महात्मा गांधी यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. त्याला कारणीभूत कीर यांनी लिहिलेले डॉ. बाबासाहेबांचे चरित्र आहे, असा आरोप अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी केला.
आंबेडकराईट मूव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर संस्थेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात आयोजित सोहळ्यात प्रा. दत्ता भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना भगत बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कस्टम विभागाचे आयुक्त राजेश ढाबरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूपेश थूलकर होते. भगत यावेळी म्हणाले, "बाबासाहेबांना जनमानसांत पोहोचविण्याचे कार्य कीर यांच्या चरित्र लिखाणाने झाले आहे. मात्र, सावरकर भक्त असल्याने त्यांनी त्यांच्या लेखनात अनेक चुकीचे संदर्भ दिले आहेत. दुसरीकडे, बाबासाहेबांच्या चळवळीतील खैरमोडे यांनी बाबासाहेबांचे चरित्र उत्तम प्रकारे मांडले आहे. बापूसाहेब कांबळे यांनीही त्यांच्या लेखनातून बाबासाहेबांच्या राजकीय जीवनाचे योग्य विश्लेषण केले आहे. मात्र, दुर्दैवाने या चरित्रकारांकडे आपण दुर्लक्ष केले आहे." डॉ. नारनवरे यांनी सांगितले की, आंबेडकरी समाजाची खरी श्रीमंती पुस्तकरूपी ज्ञानात आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमीवर दरवर्षी याची प्रचिती येते. राजेश ढाबरे यांनी सांस्कृतिक चळवळीवर भाष्य केले. प्रास्ताविक अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी केले. संचालन डॉ. मच्छिंद्र चोरमोरे यांनी केले. आभार राजन वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमात वसंत मून वैचारिक पुरस्काराने गंगाधर अहिरे यांना गौरविण्यात आले. बाबूराव बागुल कादंबरी पुरस्कार नरेंद्र शेलार, नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार सुरेखा भगत, दया पवार आत्मकथन पुरस्कार भरत राजाराम काळे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. भगवानदास हिंदी दलित साहित्य पुरस्काराने डॉ. विमल थोरात यांना सन्मानित केले गेले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan