अचलपूर : आजकाल काही जण शिवरायांना हिंदूत्ववादी ठरवित आहे. शिवाजी महाराज हिंदूत्ववादी होत, तर त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्रास का दिला आणि त्यांच्या वारसांना शूद्र का लेखण्यात आले, असे कटू प्रश्न शिवव्याख्येते तुषार उमाळे यांनी उपस्थित केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे निष्कलंक चारित्र्य असलेले राजे होते, असेही त्यांनी सांगितले.
परतवाडा, संभाजीनगर येथे शिवजयंतीच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रमामध्ये तुषार उमाळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवराय स्वराज्याचे राजे असूनसुद्धा त्यांनी एकही दासी बाळगली नाही. उलट महिलांच्या चारित्र्याला कलंक लावणाऱ्यांना त्यांनी कठोरात कठोर शिक्षा दिल्या. त्याकाळी महिलांच्या छळ होणाऱ्या कुप्रथा महाराजांनी बंद केल्या, चंद्राला डाग असला, तरी आपल्या राजाच्या चारित्र्यावर एकही डाग नाही, असे प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितल्याचा संदर्भही तुषार उमाळेंनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एसपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे, तर प्रमुख अतिथी म्हणून अचलपूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी, रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कल्याण डोंगरे, प्रमोद डेरे, पोलीस निरीक्षक संदीप चौहान, डॉ. अनंत पोरे, समाजसेविका डॉ. नीलिमा लक्ष्मीचर मुळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकरे, तालुकाध्यक्ष मंगेश मालठाने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अनंत पोरे, पोलीस निरीक्षक संदीप चौहाण आणि प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सतीश कडु, संचालन पवन दाहाटे, तर आभार दिनेश कळसकर यांनी मानले.
शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्या राजकीय नेत्यांचाही तुषार उमाळे यांनी समाचार घेतला. महाराजांचा इतिहास माहित नसणाऱ्या लोकांनी महाराजांबद्दल बोलू नये. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ६ टक्के शिक्षणाचे ध्येय गाठता आले नाही किंवा शेतकऱ्यांच्या बनियानचे भोके बुजविता आली नाही. याप्रसंगी त्यांनी हनुमान चालीसा वाटणाऱ्या नेत्यांवरही प्रखर टीका केली. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या जिल्ह्यात ही कसली नाटकं सुरू आहे, असा प्रश्न यांनी केला.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan