संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) ता. ४ : विद्रोह आणि समता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समताविरोधी प्रवृत्तीला अर्थात विषमता संपविण्यासाठी विद्रोह आला आहे. विषमतेविरोधात केवळ नकाराची भाषा वापरण्यापेक्षा संघर्ष करण्यासाठी आम्ही सज्ज असलो पाहिजे. त्यासाठी नवविद्रोहाचे तत्त्वज्ञान निर्माण करावे लागेल, असा आशावाद प्रा. गंगाधर बनबरे यांनी परिसंवादात अध्यक्ष पदावरून बोलताना केले.
मराठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात "साहित्य- संस्कृतीला अब्राह्मणी धर्मप्रवाहांनीच समृद्ध केले.. ( महानुभाव, सुफी वारकरी, आदिधर्म, लिंगायत, सत्यधर्म, सत्यधर्म, बौध्दधम्म) विषयावर पुणे येथील प्रा. गंगाधर बनबरे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद झाला. हभप धर्मकीर्ती महाराज परभणीकर, अविनाश काकडे परिसंवादात सहभागी झाले होते.
प्रा. बनबरे म्हणाले, कृतज्ञतेतून भक्तीचा मार्ग निर्माण होतो. निसर्ग, झाड, नदी, कुटुंबातील आई, व्यक्ती, अशा सर्व जनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. मराठी साहित्याला भारतातील २००० भाषांनी समृद्ध केले आहे.
ज्यात मानवाप्रतीची सहानुभूती आहे, तो खरा धर्म आहे. प्रत्येक धर्मप्रवाहांनी इथल्या धर्म व्यवस्थेची चिकित्सा केली आहे. आम्ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या विचारप्रणालीचे बळी ठरलेले लोक आहोत. एका खिशात गांधी आणि दुसऱ्या खिशात नथुराम ठेवून जगता येणार नाही. राजसत्तेला विरोध करण्यापेक्षा साहित्यिक- विद्वानांनी एकत्र येऊन स्वतःचे सरकार निर्माण करण्याची गरज आहे. इतिहासाची पाने उलतल्यास आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा अशा भूमिका मांडल्या गेल्या आहेत. मात्र, त्याचवेळी इंग्रज गेल्यानंतर आपण राज्य करू म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे पूर्वज आहेत. त्यामुळे विद्रोहाची प्रक्रिया या पार्श्वभूमीवर आपल्याला समजून घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. गुलामी आपोआप येते, तर स्वातंत्र्य संघर्षाने मिळवावे लागते आणि ते टिकविण्यासाठी सतत सजग राहावे लागते, असेही प्रा. बनबरे म्हणाले. हभप धर्मकीर्ती महाराज परभणीकर म्हणाले, महाराष्ट्रातील संतांनी सगळ्यांचे भले करण्याची भूमिका मांडली. संत परंपरेचे ब्राह्मणीकरण करण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले. अदानी हा देश आहे, मोदी हे राष्ट्र आहे तर, आरएसएस हा धर्म झाला, अशी टीका करत अविनाश काकडे यांनी, शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडून नाव प्रवाह निर्माण करणारे संमेलन विद्रोही कसे, असा सवाल केला.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan