समता पर्वाचा जागर आवश्यक

प्रेमकुमार बोके

    एप्रिल महिन्यात अनेक महापुरुषांचे जन्मदिन किंवा स्मृतिदिन येतात.त्यामुळे एप्रिल महिना हा महापुरुषांच्या विचारांनी ढवळून निघत असतो.भारतामधे वेगवेगळ्या कालखंडात जन्माला आलेल्या महापुरुषांनी या देशातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजविले आहे आणि सामान्य माणसाला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे.त्यामुळे हे महापुरुष प्रत्येकच काळात जनसामान्यांसाठी प्रेरणास्त्रोत आणि दिशादर्शक ठरलेले आहेत.एप्रिल महिन्यात डॉ. पंजाबराव देशमुख,महात्मा ज्योतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या बऱ्याच महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जातो. ११ एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा कालखंड "समता पर्व" म्हणून साजरा करण्याची प्रथा काही दिवसापासून सुरू झालेली आहे. १० एप्रिलला डॉ. पंजाबराव देशमुख यांचा स्मृतिदिन असतो.तसेच 30 एप्रिलला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती "ग्रामजयंती" म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. हे सर्व महापुरुष मानवतावादी विचारांचे होते आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिलेली आहे."बहुजन हिताय-बहुजन सुखाय" हे या महापुरुषांचे ध्येय होते.समस्त बहुजन समाजाच्या विकासाचा, कल्याणाचा आणि जागृतीचा ध्यास आयुष्यभर या महापुरुषांनी घेतलेला होता.त्यांच्या अनमोल विचारांमुळे, त्यागामुळे आणि संघर्षामुळे आज भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून सन्मानाने उभा आहे

samata parva Jagar    या महापुरुषांच्या विचारातूनच देशातील सर्वांना सोबत घेऊन चालणारे संविधान प्राप्त झाले आहे.या संविधानाच्या माध्यमातून सर्व जातीधर्माच्या लोकांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार बहाल झालेले आहेत.ज्या लोकांना येथील धर्मव्यवस्थेने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला होता,ते अधिकार संविधानामुळे सर्वांना प्राप्त झालेले आहेत.त्यामुळे देशातील सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जीवन प्रदान करण्यामधे या महापुरुषांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करणे, तरुण पिढीला त्यांच्या विचारांची जाणीव करून देणे व आमच्यासाठी या महापुरुषांचे काय योगदान होते याची वारंवार उजळणी होणे अत्यंत गरजेचे आहे,कारण सध्या या समतावादी महापुरुषांचे विचार नेस्तनाबूत करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे.या महान समाजसुधारकांचे कल्याणकारी विचार बाजूला ठेवून त्यांच्या विचारांचे विकृतीकरण सुरू आहे.या महापुरुषांनी भारतात न्याय,स्वातंत्र्य, समता आणि बंधुता निर्माण केली आणि त्यांच्या विचारातून जगाने प्रेरणा घेतली.अशा विश्वव्यापी महापुरुषांना दुर्लक्षित करून त्यांचे विचार संपवण्याचा जोरदार प्रयत्न मागील काही वर्षात भारतात सुरू झालेला आहे.अशावेळी या महापुरुषांच्या विचारांना मानणारा जो मोठा वर्ग आपल्या देशामधे आहे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे.एप्रिल महिन्यात या संत महापुरुषांच्या विचारांचे स्मरण आम्ही करतो व त्यांच्या विचारपर्वाचे आयोजन करतो. त्या अनुषंगाने या महापुरुषांचे सत्य, वास्तववादी आणि आजच्या काळात उपयुक्त असणारे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या जयंती आणि स्मृतीदिनाचे फार महत्त्व असते.

    जयंती किंवा स्मृतीदिन हे केवळ औपचारिकता म्हणून आणि जयजयकार म्हणून साजरे न करता त्याला कृतीशील उपक्रमांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे.देशात सध्या जे धर्मांध वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे ते वातावरण बदलवून त्या ठिकाणी समतेच्या विचारांची पेरणी कशी करता येईल यासाठी या महापुरुषांच्या दिनविशेषांचा आपल्याला वापर करता आला पाहिजे.कारण सध्याची पिढी धर्मांधतेच्या विषाने पोखरून टाकून त्यांचे मेंदू विषारी आणि विखारी बनवण्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा देशात कार्यरत आहे.ही यंत्रणा भारताला कट्टर धर्मांधतेकडे नेऊन तालिबानी प्रवृत्तीची आखणी करण्यासाठी उतावेळ झालेली आहे. अशावेळी समतेचा जागर करणाऱ्या लोकांना अत्यंत सावधपणे आणि काळजीपूर्वक पाऊल टाकणे आवश्यक आहे.आमच्या महापुरुषांचा प्रागतिक विचार आम्हाला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसा पोहोचवता येईल व त्यातून देशात वैचारीक,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तन कसे घडवून आणता येईल याकरीता अहोरात्र प्रयत्न करावे लागतील.त्यासाठी आम्हाला सर्वप्रथम आपसातील मतभेद बाजूला ठेवून संघटितपणे काम करणे गरजेचे आहे.तसेच समतावादी विचारांची रुजवणूक खोलपर्यंत आणि खालपर्यंत कशी करता येईल यासाठी "रोड मॕप" तयार करावा लागेल.या क्षेत्रातील तज्ञ,अभ्यासू आणि तळमळीच्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल आणि त्यातून एक सर्वसमावेशक कार्यक्रम लोकांना द्यावा लागेल.तसेच त्या कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यावर एक कठोर "पहारा समिती" नेमावी लागेल.तरच समतेच्या विचारांची पेरणी व्यवस्थितपणे होवून विषमतावादी विचारांना आपण थोपवू शकतो.

प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209