- अनिल भुसारी
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात विपरीत परिस्तिथीती असतांना आपल्या कर्तृत्वाच्या आणि सहकाऱ्यांच्या बळावर शेतकरी, कष्टकरी, महिला, दिन - दलितांना स्वातंत्र्य, न्याय, हक्क देणारे स्वराज्य निर्माण केले ते एक महान कार्य ठरले. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने अधिकृत स्वराज्याची स्थापना झाली असे म्हणता येईल. कोणतीही संघटना - संस्था निर्माण करतांना जेवढा संघर्ष करावा लागतो, तेवढाच ते टिकविण्यासाठी - त्यांचे रक्षण करण्यासाठी त्याग करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करतांना ज्या - ज्या मावळ्यांनी सहकार्य केले, बलिदान दिले त्या काळाने व नंतरच्या इतिहासाकारांनी थोड्या प्रमाणात का होईना त्यांची दखल घेतल्याचे दिसते. परंतु स्वराज्य निर्माण करतांना व निर्माण झालेले स्वराज्याचे संरक्षण करण्याचे काम ज्यांनी वयाच्या नऊव्या वर्षापासून केले त्या छत्रपती संभाजी महाराजांना मात्र अपवाद वगळता अधिकतम लेखकांनी त्यांची बदनामी व त्यांना स्वराज्यद्रोही ठरवीण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. अलीकडील काही भोंगे वाजविणाऱ्यांनी ज्यांनी स्वतःच्या काका व भावासी द्रोह केला त्यांनी सुद्धा संभाजी राजेवर टिका केली.
सामान्य लोकांच्या धार्मिक भावनांना पेटवून, धार्मिक आणि जातीय दंगली करण्याकरिता छत्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षक ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संभाजी महाराजाचा उल्लेख स्वराज्य रक्षक करताच अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. हे खर आहे की ते धार्मिक होते, धर्माचा आचरण करणारे होते, धर्माविषयी त्यांना आपुलकी होती; परंतु ते धर्मवेडे नव्हते किंवा धर्मातील वाईट रूढी, प्रथा, परंपरांचा आंधळेपणाने स्वीकार करणारे नव्हते. ते जर धर्माभिमानी होते तर मग त्यांनी त्यांच्या पत्नीला राज्यकारभार करण्याकरता "राजमुद्रा" का दिली? त्या काळात तर स्त्रियांना कोणताही अधिकार दिल्या जात नव्हता. ते कट्टर हिंदू धर्मभिमानी होते तर त्यांच्या आचरणात आणि विचारावर शाक्तपंथ धर्माचा प्रभाव असल्याचे का दिसून येते? शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेका नंतर फक्त साडेतिन महिन्यानंतरच शाक्तपंथ पद्धतीने महाराजांचा दुसरा राज्याभिषेक का करून घेतला? याचे उत्तर मात्र संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक न मानता धर्मरक्षक ही उपाधी लावणारे देतांना दिसत नाही. किंवा त्यांना त्याची उत्तरे देता येत नाही. स्वराज्य रक्षणाकरता त्यांनी जो त्याग केलेला आहे तो त्याग आणि लढाई पलीकडील छत्रपती संभाजी महाराज लोकांना समजू नयेत म्हणून त्यांना कायम धर्मरक्षक ठरविण्याचा प्रयत्न केल्या जातो. काही धार्मिक हट्टवादी आणि धर्मद्वेष्टे लोकांचा, महामानवांना इतर धर्मियांनी प्रेरणास्थान मानू नये किंवा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊ नये हा डाव असतो. हे कुटील डाव बहुजनानी समजून घेणे आवश्यक आहे. उलट सनातनी विकृत मानसीकतेच्या लोकांनी संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा, त्यांना स्वराज्यद्रोही ठरवीण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा बावन्नकशी असणार सोनं कितीही झाकून ठेवाण्याचा प्रयत्न केला असला तरी ते चमकणारच. वा. सी. बेंद्रे, जयसिंगराव पवार ऍड. अनंत दारवटकर, आनंद घोरपडे, डॉ. रामभाऊ मुटकुळे, डॉ. गिरीधर सोमवंशी, प्रा. प्रभाकर ताकवले अशा अनेक इतिहासाकारांची नावे घेता येतील की ज्यांनी संभाजीराजेंनी धर्माचे नव्हे तर स्वराज्याचे कसे रक्षण करून ते स्वराज्यरक्षक ठरलेत हॆ सिद्ध करून दाखविले.
औरंगाजेबाने मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाला स्वराज्याचा बिमोड करण्याकरिता पाठविले. दिलेरखान व मिर्झाराजेंनी चहूबाजुने स्वराज्याची नाकेबंदी केली. स्वराज्य संकटात सापडले. 'जर या क्षणी माघार घेतली नाही तर फुलत असलेले स्वराज्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही' हा विचार करून शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंसी जून 1665 ला पुरंदर येथे तह केला. या तहानुसार मोगलांची पाच हजाराची मनसब व जहागिरी संभाजीराजेंना स्वीकारावी लागली. तेव्हा शंभूराजेंचे वय होते अवघे नऊ वर्षाचे. या तहानुसार शंभूराजेंना मोगलांकडे ओलीस रहायला लागले. ज्या वयात आम्ही मायबाप एकट्या मुलाला साखर आणायला किराणा दुकानात पाठवीत नाही त्या वयात आशिया खंडातील बलाढ्य व धूर्त - कपटी बादशहाच्या छावणीत शिवाजी महाराज बाळ संभूराजेंना ओलीस ठेवतात आणि संभूराजें स्वराज्य रक्षणाकरिता ते मान्य करतात. हॆ केवढे मोठे धैर्य आणि त्याग आहे. नाहीतर अलीकडे आम्ही पाहतो, धर्मरक्षणाचे नाव घेऊन आपल्या मुलाला स्टडीत ठेवून दुसऱ्यांच्या लेकरांना कस्टडीत पाठवण्यासाठी भोंगे वाजवायला लावतात. यावरून समजून घ्या की स्वराज्याकरिता पिता - पुत्रानी किती त्याग आणि संघर्ष केला.
पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला जायचे होते. राजगड ते आग्रा हजारो किलोमीटरचा प्रवास. तोही घोड्याने धो - धो वाहणाऱ्या नद्या, उंच पर्वत रांगा ओलांडत. अशा अवघड प्रवासात महाराजांनी अवघ्या नऊ वर्षाच्या बलराजेंना सोबत घेतले. आग्रा म्हणजे दगाबाजीचं आणि प्रत्यक्ष मृत्यूचं दार. आज आमची मुलं सुखकर वाहनातून प्रवास करतांना सुद्धा सुरक्षित प्रवास कसा कराल याचे धडे त्याचे वाहन सुरु होईपर्यंत सांगतो. जसे - गाडीत समोरही नको नी मागेही नको बसू तर मध्ये बस म्हणजे मागेवून किंवा पुढेहून जरी कोणी ठोकलं तर दुसऱ्याची ठुकेल तुझी शाबूत राहील. मग त्या काळात सात महिन्याचा खडतर प्रवास त्या दोन बापलेकांनी कसा केला असेल? आणि का? पुढे आग्र्यात काय घडलं हॆ आपण जाणताच. जेव्हा महाराज औरंगाजेबाला हुलाकावणी देऊन निसटल्यावर एकट्या बाळराजेंना मथुरेत ठेवले. परकीय शत्रूच्या दरबारात जिथे कुटुंबातील एकही सदस्य नाही. अनोळखी लोकांसोबत किती काळ रहावे लागेल याची निश्चिती नाही. पुन्हा स्वराज्यात जाता येईल याची शाश्वती नसतांना बाळराजे परमुलखात राहण्यास तयात होतात ते स्वराज्यातील रयतेला आपल्या लेकरांबाळासोबत, माय - बापासोबत सुखाने रहाता यावे याकरीताच ना. समताधिष्टीत स्वराज्याचे रक्षण व्हावे म्हणूनच ना. ज्या वयातील मुलांना आपल्या हाताने जेवण करता येत नाही की, ढुंगण धुता येत नाही अशा वयात मृत्यूला आमंत्रण देणारा निर्णय घेणारे संभाजी महाराज म्हणून स्वराज्यरक्षक ठरतात.
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयास निघण्यापूर्वी मोगलांशी सौख्य करून संभूराजेंकरिता सहा हजारी मनसब पदरात पाडून घेतली. पुन्हा संभाजीराजे मोगलांचे मनसब झाले. मोगलांकडून स्वराज्यावर होणाऱ्या आक्रममनापासून बचाव कारण्याच्या दृष्टीने हॆ उचललेले पाऊल होते. आणि झाले तसेच. महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर असतांना औरंगजेबाने पुन्हा दिलेरखानास स्वराज्यावर पाठविले. स्वराज्य मोठ्या संकटात सापडले होते. प्रत्यक्ष महाराज राजधानीपासून दूर. प्रचंड मोगली सैन्य असणाऱ्या दिलेरखाना सोबत लढाई करणे म्हणजे पराभव. हॆ जाणून मोगली आक्रमणापासून स्वराज्य वाचविण्यासाठी मोगली मनसबदार म्हणून संभाजीराजेनी दिलेरखानास गाफिल ठेवण्यासाठी मैत्रीचा हात पुढे करून दिलेरखानास भेटले. दिलेरखानास संभाजीराजे भेटताच अण्णाजी पंत आणि त्याच्या जातभाईंनी आवई उठवली की संभूराजेनी स्वराज्याशी दगफटका केला. संभूराजेंची अशी बदनामी करून हॆ समताधिष्टीत स्वराज्य गिळंकृत करण्याचे ज्यांचे ध्येय होते त्यांना शिवाजी - संभाजीचे स्वराज्य रक्षणासाठीचे डावपेच कसे समजणार? संभाजीराजेंना राजद्रोही ठरवून अलपायुषी असणाऱ्या राजारामाला छत्रपती करून मन मानेल तसं कारभार करणे हा त्यांचा ध्येय होता. संभाजीराजे छत्रपतींच्या अनुपस्थित दिलेरखानाला भेटून
स्वराज्यावर कोणतेही आक्रमण होऊ देत नाही. ते स्वराज्य रक्षसणासाठीच ना...
3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांच्या मृत्यनंतर औरंगाजेबाला वाटले की आता स्वराज्याची कटकट संपली. परंतु झालं उलट छत्रपती संभाजी राजेंनी इंचभर स्वराज्य मोगलांना जिंकू तर दिलेच नाही उलट भरपूर मोगली प्रदेश स्वराज्याला जोडून घेतला. डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांच्यावर वचक बसविले. स्वराज्य विस्तार केल्यामुळे औरंगजेब भयभीत झाला आणि स्वतः तो स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी सप्टेंबर 1681 ला अजमेरहून महाराष्ट्राच्या दिशेने निघाला. औरंगजेब महाराष्टात आल्यानंतर सुद्धा राजेंनी स्वराज्याचा विस्तार केला. दक्षिण भारताचा बहुतांश भाग स्वराज्यात आणला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्युंनंतर स्वराज्याच्या रक्षणाबरोबरच स्वराज्य विस्तार सुद्धा केला. पूर्वजांनी कमवून ठेवलेल्या पुण्याईच्या बळवार पोट भरणाऱ्यांनी स्वराज्य रक्षक संभाजीराजेंवर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
अखेर दगा झाला. अण्णाजी पंत आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी राजेंना त्रास दिला होता, त्या विकृत मानसिकतेच्या लोकांनी दगफटका केल्यामुळे फेब्रुवारी 1689 ला मोगल सरदार मुकर्रबखानाने संभाजीराजेंना पकडले. जेव्हा संभाजीराजेंना औरंगाजेबा समोर हजर करण्यात आले तेव्हा औरंगाजेबाने त्यांना पुढील दोन प्रश्न केले. 1) "स्वराज्याचा खजिना कुठे आहे? आणि 2) मोगली सरदारांपैकी कोणी तुला मदत केली? हॆ जर तू सांगितलं तर तुला माफ करून जीवदान देण्यात येईल?" स्वराज्याचे निष्ठावान मावळा आणि प्रामाणिक छत्रपती म्हणून मृत्यूला आलिंगण दिले. परंतु स्वराज्याचा खजिना आणि मदत करणारे मित्र औरंगाजेबाच्या हाती लागू दिले नाही. संभाजी राजेंनी मृत्युंचा स्वीकार करून स्वराज्याचे रक्षण केले आणि म्हणूनच ते स्वराज्यरक्षक ठरतात.
छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या ह्यातीत व त्यानंतर स्वराज्य रक्षण करण्याकरिता अगणित कार्य केलेले आहे. ते लिहिण्याकरिता इतिहासाची पाने आणि लेखकांचे हात सुद्धा कमी पडतील. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांनी रक्षिलेल्या स्वराज्य कार्याची एक आठवण म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच.
स्मृतीदिनी (११मार्च१६८९) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन....!!
- अनिल भुसारी, तुमसर जि. भंडारा,
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan