अनुज हुलके
गाडगे महाराजांनी कठोरपणे देवावर टीका केली असेल, पंढरपुरात जाऊन ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरातही गेले नसतील, पण तेथे येणाऱ्या वारकऱ्याला 'कशाला येथे येतोस मारायला?' असं कधी म्हणाले नाही. त्याची त्या गर्दीतील गैरसोय बघून, निवाऱ्याला जागा नाही, हे बघून त्यांनी त्यांच्यासाठी करूणेतून धर्मशाळा बांधली. विद्रोहातून, क्रांतीतून 'करुणा' वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं. याचही भान विद्रोहींनी बाळगलं पाहिजे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं हा सुद्धा विद्रोह ठरू शकतो. याची मला जाणीव आहे. माणसा माणसांनी दंगलीत केलेल्या परस्परांच्या कत्तलीतून झालेल्या रक्तमांसाच्या चिखलातूनच कमळ चांगला फुलते, याची कमळीवाल्यांना चांगलीच जाणीव आहे. आणि द्वेषाच्या वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विषाणूचं पोषण होतं. याची कल्पना रेशीम बागेतील भागमभाग करणाऱ्याला आहे. त्यामुळे त्या विषाणूंना पोषक ठरणाऱ्या द्वेषाला दूर सारत प्रेमाचा अंगीकार करणे, हा सध्याच्या काळातील विद्रोह ठरणार आहे." असे घनाघाती प्रहार विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष मान. चंद्रकांतदादा वानखेडे यांनी वर्धा येथील सतराव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी भरगच्च भरलेल्या मंडपात केले.
४ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी नऊ वाजता अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाची विचारयात्रा सुरू झाली. वर्धा जिल्ह्यातील पाथरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील धैर्यवान स्त्री मा. सुनंदा चरडे या भगिनीला प्रस्तुत विचारयात्रा प्रारंभ करण्याचा सन्मान मिळाला. शिवाजी पुतळ्यापासून यात्रेला अलोट गर्दी जमू लागली. बघता बघता वर्धा नगरीच्या मुख्य रस्त्यावर सुमारे एक-दिड किमी. लांब विचारयात्रेतील आदिवासी नृत्य, लेझीम मोरपंखी मुकुटधारी आदिवासी -डफावरील- नृत्य, सिबली नृत्य, विविध महामानवांच्या वेशभूषा केलेले चित्ररथ,सजवलेल्या बैलगाड्या आणि शिस्तीत चालणारे विचार पेरणारे संमेलनाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते, आयोजक, संयोजक, कार्यकर्ते आणि विद्रोही प्रवाहाचे वारकरी यांचे पथसंंचलन मुख्य आकर्षणाचा बिंदू ठरला. ही विचारयात्रा इतकी वैविध्यपूर्ण ठरली की संपूर्ण वर्धा नगरी विद्रोहीच होऊन गेली. समाजमाध्यम, पत्रकार, वृत्तवाहिन्या यांचे प्रतिनिधी प्रत्येक क्षण टिपण्यास सरसावत असताना जोशपूर्ण नारे आणि क्रांतीगीतांचे गायन यामुळे अवघा विचारयात्रापथ दुमदुमून गेला होता. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, भगतसिंग, यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून विद्रोहीचे जणू त्यांना आवतण देत सुमारे दोन ते अडीच तास मार्गक्रमण करत विचारयात्रा संमेलनस्थळी पोहोचली.
संमेलन स्थळावरील सृजनशीलतेने उभारलेले प्रवेशद्वार प्रदर्शनी आणि ग्रंथदालनाचे विनाविलंब उद्घाटन निमंत्रीत मान्यवरांच्या हस्ते सहर्ष पार पडले. विद्रोहीचा मांडव भरगच्च भरलेला. खुर्च्या भरून आजूबाजूला परिसरात विद्रोहीचे साक्षदार होण्यासाठी स्त्री-पुरुष उभे होते. उद्घाटनाला महात्मा फुले रचित सत्याचे अखंड शीतल गावित आणि सत्यशोधक कार्यकर्ते नंदुरबार यांनी गाऊन, अमृत भिल्ल धुळे यांच्या पावरी वादनाने आणि 'वंदन माणसाला...' या वामनदादा कर्डक रचित गीताने गाऊन, अपारंपारिक पद्धतीने कुलुपबंद मानवी मेंदूला चाविने मुक्त करून विद्रोहीच्या शिरस्त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उद्घाटन पार पडले.
मान्यवरांचे स्वागतानंतर विद्रोही साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी केले आणि विद्रोही चैतन्य निर्माण झाले. स्वागताध्यक्ष प्रा.नितेश कराळे यांचे भाषण आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका मांडत असताना विद्रोहीची वाटचाल आणि भूतकालीन सांस्कृतिक लढ्याची वर्तमान वर्तमानकालीन प्रासंगीकता आधोरेखित केली. मा. रसिका आगाशे, मावळते संमेलनाध्यक्ष मा.गणेश विसपुते यांच्या दीर्घ वक्तव्यानंतर स्वागताध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे यांनी केलेली अध्यक्षीय भाषण म्हणजे "सांप्रतची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक लढा भक्कम करण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाची भूमिका असून या देशातील कष्टकरी श्रमिक संस्कृतीशी विद्रोहाचा धागा किती अतूट आहे" हे दीर्घभाषणातून विशद करणारे ठरले. "विद्रोह हा नकार नसून विद्रोहातून नवनिर्मिती आणि तीही न्याय समतावादी मूल्यांची रुजवणूक, एकमय राष्ट्राकरिता प्रेम, करुणा, बंधुभाव निर्माण होईल अशी व्यवस्था, द्वेष आणि मत्सर यांना नकार म्हणजे विद्रोहाची ललकारी ठरेल." १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी संमेलना अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
उद्घाटनानंतर, संघर्ष हेच जीवनाचे ब्रीदवाक्य मानून कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'विद्रोही जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंबेडकरवादी लेखिका, संस्कृततज्ञ डॉ. कुमुदिनी पावडे; दलित पँथरचे संस्थापक व लेखक मा. ज.वि.पवार; बहुजन संघर्षचे संपादक मा. नागेश चौधरी; झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर; भटके-विमुक्त संघटक व प्रश्नचिन्ह शाळेचे संस्थापक मा. मतीन भोसले; ज्येष्ठ सत्यशोधक शिक्षणतज्ञ मा. महादेवराव भुईभार; आदिवासी नेते देवाजी तोफा; शोध पत्रकार स्मृतीशेष सुरेश धोपटे यांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आलेख मानपत्र वाचनातून होत असताना विद्रोहीचा मंडप समतावादी न्यायाच्या लढ्यातील मातब्बर लढवय्यांच्या जीवनातील ऐतिहासिक आठवणींनी उजळून निघत होता. विद्रोही संमेलनासाठी बोधचिन्ह, संमेलनगीत चित्र आदि कलावंताचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
'मराठी साहित्य संस्कृतीला अब्राम्हणी धर्म प्रवाहांनीच समृद्ध केले' या परिसंवादात महानुभाव, सुफी, वारकरी आदी धर्म लिंगायत शाक्य धर्म बौद्ध धम्म या धर्म प्रवाहांच्या अनुषंगाने मा. अविनाश काकडे, हभप धर्मकीर्ती महाराज परभणीकर, प्रा. संतोष सुरडकर यांनी विषयाची मांडणी केली. प्रा. गंगाधर बनबरे यांचे अध्यक्षीय भाषण उपस्थित समुदाय श्रवण करत होते.
'लेखकांची सांस्कृतिक भूमिका काय आहे? काय असावी?' या परिसंवादात मा. संजय जीवने, डॉ. नारायण भोसले, डॉ. मारुती कसाब, प्रभू राजगडकर यांनी विषयावर विस्तृत मांडणी केली. 'महामानवांची बदनामी, माफीवीरांचे उदातीकरण, इतिहासाचे विकृतीकरण आणि संस्कृतीच्या मिराजदारांचे राजकारण' या परिसंवादात मा. वैशाली डोळस, सतीश जामोदकर यांनी सद्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने विश्लेषण केले. तर मा. निरंजन टकले यांचे अध्यक्षीय भाषण विद्रोही साहित्य संमेलनातील प्रमुख आकर्षण ठरले. त्यांच्या मॅराथॉन चाललेल्या अभ्यासपूर्ण गंभीर मांडणीला रसिक कानात प्राण आणून साद देत होते. त्यांच्या भाषणातील आशय संमेलनात सर्वाधिक चर्चिला गेला.
'एकमय राष्ट्र निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित संविधान संस्कृती' या विषयावरील व्याख्यान मा. हिराचंद बोरकुटे यांच्या मांडणीने झाले. शेतकरी कष्टकरी समाज व भारतीय समाजवास्तव विकासाचे प्रश्न मागासले पण या आणि अशा विषयाच्या अनुषंगाने प्रेम, धर्म, पर्यावरण, संस्कृती, साहित्य, शिक्षण, शेती नागरिकत्व, जल-जंगल-जमीन, ओबीसीची जातवार जनगणना, प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य, स्त्रियांचे प्रश्न अशा विविध सोळा विषयांवर गटचर्चा आयोजित करण्यात आली. गटप्रमुखांनी विषयांचे सादरीकरण केले त्यातून या विषयांचे अनेक कंगोरे दिसून आले. सांस्कृतिक कला प्रदर्शनी आणि सादरीकरण विद्रोहीचे खास वैशिष्ट्ये ठरले. नागरिकत्व या विषयावरील पथनाट्य, द नेशन लघुनाट्य, संमेलनाच्या पूर्वसंध्येला सादर झालेले 'व्हाया सावरगाव खुर्द' 'क्रांतिबा क्रांतीमा' शो.शि.त. (शोधला शिवाय तर) इत्यादी क्रांतीगर्भातील नाटके, 'ज्योती झाली ज्वाला', 'मी भिडेवाडा बोलतोय', 'मी सावित्री ज्योती महात्मा फुले,' 'सावित्रीच्या लेकीची गाथा', एकपात्री प्रयोग आणि खास वैशिष्ट्यपूर्ण नागपूर येथील शिक्षक मित्रांनी सादर केलेले महात्मा फुले लिखित 'तृतीय रत्न' हे नाटक,महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेस लिहलेल्या पत्राचे वाचन विद्रोहीची सांस्कृतिक परंपरा बलवत्तर किती आहे हे दर्शवितात. कवी व गझलकार संमेलनातील सुमारे
तीन- साडेतीनशे कवींचा सहभाग विद्रोही साहित्य निर्मिती समृद्धीचे दर्शक ठरते. बालमंचच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची वेशभूषा, वक्तृत्व, कविता, पथनाट्य, लेझीम बालकातील विद्रोही प्रतिभा फुलवण्याचे कार्य करताना दिसते. संमेलन स्थळाला शेतकरी आत्महत्या चित्र प्रदर्शन, चित्र काव्य प्रदर्शन, खानदेशातील आंबेडकर चळवळ पोस्टर प्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन दर्शनी यामुळे वातावरणात जिवंतपणा आल्याशिवाय राहत नाही.
विद्रोहीची आतापर्यंत सोळा साहित्य संमेलन विविध ठिकाणी झालीत.प्रचंड गाजलीत. यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर विद्रोहीच्या मंडपात भेट करते झाले. विद्रोहीचे अध्यक्षांनी आणि आयोजकांनी त्यांचे यथार्थ स्वागत केले. विद्रोहीचा लढा मानवतेसाठी आहे व विचाराने भिन्न असला तरी तो माणूस आहे या मूल्यांचा यातून परिचय घडून आला. विद्रोहाचा सांस्कृतिक वारसा फारच व्यापक आणि प्रदीर्घ काळापासून चालत आलेला आहे. मानवांचे अवघे जीवन व्यापून टाकणाऱ्या या प्रवाहास कित्येकांचे योगदान सम्रुद्ध करत आले.अनार्य,अवैदिक, अवैदिक, मुलनिवासी, अब्राह्मणी, ब्राम्हणेतर, बहुजन अशा विविध नावाने ज्ञात ही धरोहर विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रयत्नातून सम्रुद्ध होत आहे.विद्रोही संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. गणेश विसपुते, सतरावे विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले प्रा. जावेद पाशा आणि इतर वक्तांनी केलेल्या मांडणीतून विद्रोहीचा लढा दिवसेंदिवस विराट होत असल्याचे दिसून येते.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे पदाधिकारी मा. किशोर ढमाले,प्रा. प्रतिमा परदेशी, मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे,स्वागताध्यक्ष नितेश कराळे, यांच्या हातात हात घालून मिलिंद सवाई, वनश्री वनकर, गुणवंत डकरे,राजेंद्र कळसाईत,अनुज हुलके, मीराताई इंगोले, माधुरी शेलोकर, अनिता येवले, वंदना वनकर, पूजा जाधव, ज्योती बनकर, अविनाश पोईनकर, प्रा. जनार्दन देवतळे, सुनील बुरांडे, सुधीर गिरे, नंदकुमार वानखेडे, कपिल थुटे, धनंजय सोनटक्के, मिलिंद जूनगडे, प्रवीण पाटभाजे, श्याम शंभरकर,गिरीधर कोठेकर, नरेंद्र पठाडे, अर्चना भोमले, गजानन बुरांडे, डॉ. रवीदंत कांबळे, शारदा थुटे, बाबा बिडकर,डॉ विश्वनाथ बेताल, प्रदीप ताटेवार, राजू गोरडे, विलास भवरे, उपाली सवाई, राजकुमार मून, संदीप चिचाटे, रवी चावके, मा. अनंता राऊत, बळी खैरे, मोहित सहारे, प्रकाश भेले, गजानन सोरते, शारदा झामरे, श्रीया गोडे,सविता घोडे,चेतना सवाई, पी एस खिलारे, यशवंत फडतरे, अशोक ठाकरे, नूतन माळवी,प्रियराज म्हैसकर, सुधीर गवळी,अशोक कांबळे, शरद वानखेडे, सुनीता काळे प्रा.एकनाथ मुरकुटे, प्रा.सुधाकर सोनोने इ. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते;विदर्भ- वर्धा जिल्ह्यातील मंडलच्या आंदोलनातून जडणघडण झालेल्या ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्यांक विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते किती किती झटले, त्यांच्यातील सख्य, सचोटी, समन्वय,समर्पण विद्रोही साहित्य संमेलनाचे भव्य आयोजनातून दिसून आले. संमेलनांतील ठराव भरगच्च गर्दीने हात उंचावून पारित केले. लेखक कवी चित्रकार पत्रकार नाटककार कलावंत प्राध्यापक शिक्षक आणि असंख्य कार्यकर्ते सुमारे तीन महिने सातत्याने राबले त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनास उदंड प्रतिसाद, ऐतिहासिक उत्तुंग यश मिळाले.विचारांची पेरणी करण्यासाठी नांगरलेल्या संमेलनभूमीतून भरगच्च पिक पदरात पडले.उद्याच्या लढ्यासाठी क्रांतीबिजं पुरतील एवढे!
अनुज हुलके
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan