सेवाग्राम (वर्धा) : महात्मा गांधींच्या कर्मभूमीत मला भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांच्या विषयी बोलण्याचे भाग्य लाभले आहे. गांधीजींशी त्यांचा संबंध जिव्हाळ्याचा राहिला आहे. सरहद गांधी या नावाने त्यांना ओळखले जात असून त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. हिंदू- मुस्लीम यांच्या एकोपा आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. ते पठाण असूनही त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव राहिल्याने ते अहिंसावादी बनले. दोघांचेही जीवन संघर्षमय राहिले यात शंका नाही. खान अब्दुल गफार खान आणि गांधीजी आपले आदर्श असून नव्या पिढींना यांची ओळख करून देण्याची जबाबदारी आहे, असे आवाहन इतिहास लेखक सय्यद उबैदुर रहमान यांनी केले.
भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्ताने शांती भवनमध्ये आयोजित 'सेलिब्रेट अवर नॅशनल हीरो' या कार्यक्रम प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनील केदार होते. अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा, माजी मंत्री अशोक शिंदे, सरपंच सुजाता ताकसांडे, विदर्भ मुस्लीम इंटेलेक्चुअल्स फोरमचे अध्यक्ष शकिल सतार, परवेझ सिद्दिकी, अॅड. फिरदोस मिर्जा, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर उपस्थित होते. आशा बोथरा यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात खान अब्दुल गफार खान यांचे योगदान मोठे आहे. भारत-पाकिस्तान अखंड राहावा असे सरहद गांधी व गांधीजींना वाटत होते. त्यांनी खुदाई खितमतगार ही संघटना तयार करून अहिंसेच्या माध्यमातून लढा दिला. आज देशात निर्माण झालेल्या स्थितीला आपल्या विचारातून साफ करावे लागेल. देश आपला असून अहिंसा आणि प्रेमाचा संदेश येथून दिला पाहिजे, असे आशा बोथरा म्हणाल्या. सुनील केदार यांनी ही तपोवन भूमी असून खान अब्दुल गफार खान यांचा संबंध गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळीत राहिला आहे. स्वातंत्र्य चळवळीत धर्म पाहिला नाही. मग सरकार बनविताना तो का पाहिला जातो, असा प्रश्न उपस्थित केला. स्वातंत्र्य मिळविताना संघर्ष व त्रास सहन करावा लागला. आज पण सर्वांनी एकत्रित येऊन आवाज बुलंद करावा लागेल अन्यथा ही पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे सांगितले. संचालन परवेज सिद्दिकी तर आभार आफताब खान यांनी मानले. या कार्यक्रमाला वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर येथील ४०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लीम क्रांतिकारी यांचे छायाचित्र मान्यवरांना रहमततुल्ला खान यांनी दिले.