नागपूर : विदर्भातील अमरावती येथे नुकतेच राज्यस्थरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन संपन्न झाले. समारोपीय सत्रात, श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या चळवळी समोर सध्या असलेली आव्हाने, तसेच प्रचारकांचे कर्तव्य काय? या विषयांवर आपले विचार मांडत राष्ट्रसंतांना पुजेत बसवुन देव बनवू नका. त्यांचे विचार डोक्यात घ्या मानवी जीवन जगण्याचा सुखकर मार्ग सापडेल. अंधश्रध्दा - अंधरूढ्या सर्वप्रथम श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या सेवकांच्या जीवनातून नष्ट व्हाव्यात तेव्हाच तो बोलण्याचा अधिकारी ठरतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात,
लाख बोलक्याहूनि थोर ।
एकचि माझा कर्तबगार ।
हे वचन पाळूनी सुंदर ।
गाव सुधारावे कार्याने ॥
ग्रा.अ. 7
असे परखड मत साहित्य संमेलनात राष्ट्रसंतांच्या साहित्याचे दाखले देत राष्ट्रसंतांच्या साहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी मांडले.