सोलापूर, ता. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान हा प्रकार म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने केली आहे.
फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे व संघटक अॅड. आर. जी. म्हेत्रस यांनी ही भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी यांनी 'सारे चोरो के नाम मोदी कैसे है' यावरून भाजपने राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा पर्यायाने देशातील ७० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे असा डांगोरा पिटत आहेत. हा प्रकार निव्वळ खोटा आहे.
मोदी आडनाव हे बनिया, पारशी, मुस्लिम, मारवाडी अनेक जातीधर्मामध्ये आहे. ओबीसी समाज हा मंडल आयोगाच्या शिफारशी किंवा संशोधनानानुसार ३,७४३ जातींचा समूह आहे. या समाजाची लोकसंख्या सुमारे ९० कोटींच्या घरात आहे. गुजरात मधील मोदी (घाची ) हा समाज मंडल आयोगाच्या यादीत नाही. नरेंद्र भाई मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी षडयंत्र करून घांची समाज हा ओबीसीमध्ये घालून आरक्षण लाटले आहे. मोदी हे जर ओबीसींचे पंतप्रधान असतील तर मग त्यांनी २०११ साली झालेली (SECC २०१ ९) जात निहाय जनगणना का जाहीर केली नाही? ओबीसींचा इम्पीरिकल डाटा का दिला नाही? ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय 'का केले नाही? ओबीसींच्या वाट्याला येणाऱ्या ११ लाख कोटीचा निधी फक्त ५ हजार कोटी पर्यंत इतका कमी का केला? ओबीसींना विकासासाठी एससी किंवा एसटी प्रमाणे स्वतंत्र बजेट तरतूद का केली नाही? ओबीसींना ग्रामपंचायत पासून संसदपर्यंत आरक्षण का दिले नाही? हे प्रश्न समोर येतात.