मुंबई, ता. १ : देशातील अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करीत त्याविरोधात राज्यातील समविचारी विविध पक्ष संघटनांनी एकत्र येऊन जनजागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आज चर्नी रोड येथील सर्वोदय मंडळात विविध पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. वस्त्यांमध्ये जाऊन मोदी सरकार विरोधात लोकजागृती करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. राम पुनियानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला काँग्रेसचे राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण, भाकपचे प्रकाश रेड्डी, सर्वोदय मंडळाचे विजय दिवाण, नंदा म्हात्रे, टीचर डेमोक्रॅटिक फेडरेशनचे जनार्दन जंगले, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. विवेक कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवणे आणि संविधान वाचवण्यासाठी देशातील समस्त नागरिकांपुढे मोठे आव्हान निर्माण करण्यात आले आहे, असे सांगत जनतेने पुन्हा एकदा भारतीय लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी रस्त्यावर यावे, यासाठी नागरिकांना आवाहन केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. बैठकीच्या अखेरीस एका कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली.