बुलढाणा : महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील ब्राह्मण पुरोहित हटवून बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली.
अलीकडेच नाशिकच्या काळाराम मंदिरात युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती या दर्शन व पूजाविधीसाठी गेल्या असता तेथील पुरोहितांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार देऊन अपमानित केल्यानंतर सामाजिक क्षेत्रात एका वादाला नव्याने तोंड फुटले. यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत मराठा सेवा संघाने पुरोहितांच्या वागणुकीचा निषेध केला. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीतही असेच वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणण्याचे प्रकरण झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुरोहितांनी आता त्याच शाहू घराण्यातील युवराज्ञी संयोगिता यांच्या पूजाविधीत केली. ही बाब गंभीर व निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली. सर्व हिंदू मंदिरातील वंशपरंपरागत सुरू असलेली ब्राह्मण पुरोहितांची पुजा विधी व अन्य सेवेतील मक्तेदारी संपुष्टात आणा व मंडल आयोगानुसार मंदिरामध्ये बहुजन समाजातील पुजारी नेमण्याची प्रक्रिया त्वरीत सुरू करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.