- प्रेमकुमार बोके
कोणत्याही संवेदनशील माणसासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांनी केलेली आत्महत्या अतिशय हृदयद्रावक आणि मेंदूला झिणझिण्या आणणारे होते. त्यानंतर काही कृषीतज्ञ आणि संस्थांनी सरकारला कृषीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक अहवाल सादर केले. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने हे अहवाल फार गांभीर्याने घेतले नाही आणि त्यावर कोणतेही अभ्यासपूर्ण निर्णय सुद्धा घेतलेले नाही. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन आपण सर्व अन्नदात्यांच्या अन्नावर जगणारी माणसं असल्यामुळे अन्नदात्याच्या दुःखात आपण सहभागी असलो पाहिजे या प्रांजळ हेतूने जेष्ठ शेतकरी अभ्यासक आणि आंदोलक अमर हबीब यांनी मागील सात वर्षांपासून "किसानपुत्र आंदोलन" या नावाने एक वेगळी चळवळ सुरू केली आहे. १९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सामुहिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या किंवा आपलं काम करताना सुद्धा एक दिवसाचा उपवास अन्नदात्यासाठी करावा अशी या आंदोलनाची संकल्पना आहे. अमर हबीब यांच्या म्हणण्यानुसार एक दिवसाच्या अन्नत्यागामुळे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील असे नाही, परंतु या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या नजरेत आणून देण्यासाठी एक संवेदनशील माणूस म्हणून आपली प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी आहे या उद्देशाने या आंदोलनाची आखणी केलेली आहे. त्यामुळे १९ मार्चला किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, संस्था, जात, धर्म न पाहता केवळ माणूस म्हणून शेतकऱ्यांप्रती संवेदना व त्याच्या वेदनेचे स्मरण करण्यासाठी एक दिवसाचे हे अन्नत्याग आंदोलन आहे. प्रत्येक सरकारच्या काळात आत्महत्या सुरू आहे. त्याला कोणताही राजकीय सत्ताधारी पक्ष अपवाद नाही. मागील आठ वर्षांत ७४४४ शेतकन्यांनी आपले जीवन संपविले आहे. तरीसुद्धा कोणत्याही सत्ताधिकार्यांना त्याचे दुःख होत नाही ही फार खेदाची बाब आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव तर सोडाच उलट शेतमालाचे भाव नियोजनपूर्वक पाडण्यात येत आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना सूट देऊन सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे बिकट करून टाकले आहे. खते, बी बियाणे, फवारणी औषधे यांच्या किमती गगनाला भिडल्या असून त्यावर ओरड होऊ नये म्हणून दोन दोन हजाराचा तुकडा शेतकऱ्यांच्या समोर फेकून आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतो आहे. असा आव सरकार आणत आहे. ही शुद्ध फसवणूक असून अन्नदात्याच्या कष्टाला कोणतीही प्रतिष्ठा न देण्याचा हा घृणास्पद प्रयत्न आहे.
सिलिंग कायदा आणून शेतकऱ्यांच्या कमाल जमीन बाळगण्याच्या अधिकारावर मर्यादा आणली. त्यामुळे शेतीत गुंतवणूक थांबली. आवश्यक वस्तू कायद्यामुळे शेतमालाचे भाव पाडणे सरकारला सोपे गेले. अनेक जाचक कायद्यांचा शेतकऱ्यांच्या विरोधात वापर करून त्यांना फसविणे सुरू आहे. त्यामुळेच दररोज ४० ते ५० शेतकरी आत्महत्या करीत आहे आणि स्वतःला सुसंस्कृत समजणारे महाराष्ट्र राज्य यामधे आघाडीवर आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच संवेदनशील नागरिक म्हणून व शेतकऱ्यांच्या अन्नावर जगणारी माणसं म्हणून आम्हा प्रत्येकासाठी ही शरमेची बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःचा उदो उदो करून घेणाऱ्या नेत्यांनी पक्षीय मतभेद विसरून एका ठिकाणी बसावे आणि तज्ञांनी सुचविलेल्या योग्य उपाय योजना प्रत्यक्ष अमलात आणाव्यात तरच काहीतरी समाधानकारक होवू शकते. केवळ वरवर मलमपट्टी करून आणि कर्जमाफी करून चालणार नाही. तर जोपर्यंत शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला उचित भाव मिळण्याची हमी त्याला कायद्यानुसार मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे दारिद्र्य कमी होणे अवघड आहे. त्यामुळे किसान पुत्र आंदोलनाचा पाया रचणारे अमर हबीब यांच्यासारखे अनेक शेती प्रश्नाचे अभ्यासक आहे त्यांना सरकारने निमंत्रित करून त्यांच्याकडून हे प्रश्न समजून घेण्यात काहीही कमीपणा समजू नये. सर्व गोष्टी आपल्यालाच समजतात व आपणच सगळ्या गोष्टींचे तज्ञ आहोत असे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समजू नये. तुमची जी प्रतिष्ठा, पैसा, पद, पत व कोट्यावधींची संपत्ती आहे ती या देशातल्या कष्टकरी कामकरी लोकांच्या श्रमावर उभी झालेली आहे. शेतकयांच्या घामातून या देशातले राजकीय पुढारी स्वतःचे इमले उभे करतात आणि घाम गाळणाऱ्यांना मात्र शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. स्वतःला राजकीय पुढारी म्हणवून घेणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांसाठी ही अतिशय लज्जास्पद बाब आहे.
तेव्हा १९ मार्चला होणाऱ्या किसानपुत्र आंदोलनामधे कोणते प्रश्न मांडले जातात हे सरकारने आपल्या प्रतिनिधीच्या मार्फत तरी निदान समजून घ्यावे. त्या प्रश्नांचा समस्यांचा गंभीरपणे अभ्यास करावा आणि ठोस उपाय योजना शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भात कराव्यात. तरच या देशातला अन्नदाता, आमचा बळीराजा सुखासमाधानाने जीवन जगू शकेल. अन्यथा या देशातली कृषी व्यवस्था जर संपुष्टात आली तर सगळा देश संकटात सापडेल याची जाणीव सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. या देशातला मोठा रोजगार शेतीवर अवलंबून आहे आणि ती शेतीच जर संकटात सापडत असेल तर शेतकरी तर संपेलच पण शेतमजूर, कामगार, कारखानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांनाच त्याचा मोठा फटका बसेल हे समजून घेणे हीच खरी शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि कृतज्ञता आहे आणि त्यासाठीच प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी का होईना १९ मार्चला साहेबराव करपे आणि आत्महत्या केलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या स्मरणार्थं व त्यांच्या वेदनेचे स्मरण म्हणून एक दिवस उपवास करावा. यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने सर्वांना नम्र आवाहन करण्यात येत आहे.
- प्रेमकुमार बोके 9527912706
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan