प्रेमकुमार बोके
समाजामधे काम करीत असतांना विविध प्रकारचे लोक आपणास पाहायला मिळतात.काही लोक चिमूटभर काम मूठभर दाखवून त्याची वारेमाप प्रसिध्द करीत असतात.तर काही लोक हिमालयासारखे उत्तुंग काम करुनही कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करीत नाही.त्यांचे काम निरपेक्ष व निस्वार्थी भावनेने ते करीत असतात.अशा लोकांची वेळीच दखल घेणे व त्यांचा जीवंतपणीच उचीत सन्मान करणे ही सुज्ञ समाजाची जबाबदारी असते.परंतु आपल्या देशात असे होतांना फारसे दिसत नाही.सत्तेशी जवळीक असणाऱ्या लोकांना बरेच काही मिळते.परंतु जे लोक आयुष्यभर समाजाशी जवळीक साधून असतात,ते मात्र नेहमीच दुर्लक्षित राहतात.असेच एक समाजाशी जवळीक व जिव्हाळा असलेले आणि संपूर्ण आयुष्य समाजासाठी झिजवणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध प्रबोधनकार व सप्तखंजरीवादक मा.सत्यपाल महाराज होय.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सिरसोली या गावात एका गरीब कुटूंबात सत्यपाल महाराजांचा जन्म झाला.लहानपणापासून संतविचाराची आवड असल्यामुळे भजन,किर्तन,प्रवचन यामधे जावून बसणे व त्यात प्रत्यक्ष सहभागी होणे हा त्यांचा छंद.त्यातही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजरी भजनात त्यांना जास्त रस वाटायचा व खंजरीचे खूप आकर्षण वाटायचे.परंतु घरी खंजरी नव्हती.त्यामुळे मडक्याच्या फुटलेल्या तोंडाला कागद चिकटवून ते खंजरी तयार करायचे.वयाच्या १३-१४ वर्षापासून महाराज खंजरी वाजवायला लागले.एका खंजरीचे दोन-तीन-चार असे करत आज ते एकाच वेळी सात खंजऱ्या वाजवितात आणि समाजाचे प्रबोधन करतात.५० वर्षाहून अधिक काळ सत्यपाल महाराज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक राज्यात समाजप्रबोधन करीत आहेत.हजारो कार्यक्रम झाले.अनेकदा महाराष्ट्र आडवा-उभा पालथा घालून झाला.महाराष्ट्राचे एकही गाव नसेल की जिथे महाराजांना लोक ओळखत नसतील.त्यामुळे सत्यपाल महाराज हे अस्सल व सत्य प्रबोधनाच्या क्षेत्रातील चलणी नाणे आहेत.
सत्यपाल महाराज हे एक वेगळे रसायन आहे.त्यांच्या नावासमोर महाराज शब्द जरी लोकांनी आदराने लावलेला असला तरी सध्याच्या तथाकथित महाराजांचा जो झगमगाट आणि पंचतारांकीत जीवनशैली असते, त्यापासून सत्यपाल महाराज कोसो दूर आहेत.अत्यंत साधी राहणी आणि अत्युच्च विचार असलेले महाराज म्हणजे आजच्या लबाड व ढोंगी साधूंसमोर फार मोठा कृतीशील आदर्श आहे.महाराष्ट्राच्या किर्तन परंपरेला नवीन आयाम देण्याचे मोठे काम महाराजांनी केले आहे.चाकोरीबध्द किर्तनाला त्यांनी मुक्त केले असून संत नामदेव-तुकोबांचा खरा वारसा ते चालवित आहे.अध्यात्माला सामाजिकतेची जोड देवून समाजाचे दुःख,समस्या,अडचणी किर्तनातून मांडून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न महाराज करीत असतात. महाराष्ट्रातील संतपरंपरेचा परिवर्तनवादी विचार लोकांसमोर मांडण्याचे धारिष्टय फक्त सत्यपाल महाराजांमधेच आहे.बहुजनवादी महापुरुषांचे विज्ञानवादी विचार तेच हिंमतीने लोकांसमोर मांडू शकतात.देशाच्या कोणत्याही राजकीय सत्ताधिकाऱ्यांना खडे बोल सुनावण्याची हिंमत सत्यपाल महाराजातच आहे.
किर्तनाचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी कसा करायचा असतो हे गाडगेबाबानंतर सत्यपाल महाराजांनाच समजले.म्हणूनच त्यांच्या किर्तनाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित असतो.किर्तन ही आमच्या संतांची पवित्र परंपरा आहे.त्यामुळे त्याचा उपयोग हा समाजहितासाठीच झाला पाहिजे व त्यातून समाजोन्नती साधली गेली पाहिजे याची नेहमी महाराजांनी आवर्जून काळजी घेतली आहे.त्यामुळे समाजाच्या ज्या सद्यस्थितीतील समस्या आहे त्यावरच आधारीत महाराजांचे किर्तन असते.अंधश्रध्दा,बुवाबाजी,घातक प्रथा,परंपरा,कर्मकांड,जातीयता,धर्मांधता,स्त्री भ्रूणहत्या,पर्यावरण रक्षण,महिला सक्षमीकरण,देशप्रेम,शिक्षण,उद्योग,व्यवसाय,व्यसनमुक्ती यासारखे अनेक ज्वलंत विषय घेवून ते हजारो लोकांसोबत एकाचवेळी संवाद साधतात.लोकांना विचार करायला लावणारे प्रश्न विचारुन त्यांच्याकडूनच प्रश्नांची उत्तरे काढून घेतात.गाडगेबाबांच्या प्रश्नोतर शैलीचा ते आपल्या किर्तनात खूबीने वापर करतात.त्यामुळे मागील ५० वर्षात त्यांनी लाखो लोकांमधे जागृती करुन फार मोठे परिवर्तन घडवून आणले आहे.
अशा सच्च्या प्रबोधनकाराला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार *महाराष्ट्र भूषण* मिळावा अशी मागणी अनेक वर्षापासून महाराष्ट्रातून होत आहे.सध्या या मागणीने चांगलाच जोर पकडला आहे.सोशल मीडियातून लाखो लोक ही मागणी करीत आहे व सत्यपाल महाराजांना हा पुरस्कार का आवश्यक आहे याची मांडणी करीत आहे.१९९६ पासून सुरु झालेला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आतापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना मिळाला आहे.त्यांच्या तुलनेत महाराजांचे कार्य कुठेही कमी नाही.समाजाच्या सर्व स्तरात त्यांचे कार्य पोहचले असून त्यातून फार मोठे सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक परिवर्तन झाले आहे.राजकीय,सामाजिक क्षेत्रातील समस्त गणमान्य व्यक्तींना महाराजांचे कार्य व कर्तृत्व माहित आहे व त्यांच्या कार्याचे ते साक्षीदार आहेत.त्यामुळे महाराजांसाठी या लोकांनी सुध्दा पुढाकार घेतला पाहिजे.सत्यपाल महाराज हे २१ व्या शतकातील कर्ते समाजसुधारक आहे.त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड असते.म्हणूनच आपल्या कुटूंबातील कोणतेही सुखदुःखाचे प्रसंग ते संतविचाराला अनुसरून करतात ही त्यांची खरी ओळख आहे.त्यामुळे त्यांचा आदर्श घेवून चालणारे आज लाखो अनुयायी महाराष्ट्रात तयार झाले आहेत.तसेच त्यांची किर्तन परंपरा चालविणारे पन्नास पेक्षा जास्त *पाल* आज महाराष्ट्रामधे प्रबोधन करीत आहे.त्यामुळे आधुनिक किर्तनकारांची नवी परंपरा महाराष्ट्रात निर्माण करणारे सत्यपाल महाराज हे *महाराष्ट्र भूषण* चे खरे मानकरी व हकदार आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची ही वास्तव मागणी लक्षात घेवून सरकारने त्यांना या वर्षीचा *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार घोषित करावा व खऱ्या प्रबोधनकाराचा जीवंतपणी सन्मान करावा ही विनंती.
प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, ९५२७९१२७०६, ६ नोव्हेंबर २०२१
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan