जत : १५ फेब्रुवारी २०२३ - जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने संत रविदास जयंती ओबीसी कार्यालय नदाफ मल्टीपर्पज हॉल सातारा रोड जनावर बाज़ार जवळ जत येथे साजरी करण्यात आली . यावेळी संत रविदास यांच्या विषयी बोलताना जत तालुका ओबीसी संघटनेचे प्रमुख तुकाराम माळी म्हणाले की भारतीय परंपरेत संत संप्रदायाला महत्वाचे स्थान आहे. सामाजिक सुधारणा आणि समाजाला चांगला मार्ग दाखविण्याचे कार्य संतानी केले आहे. संत रविदास हे उत्तर भारतीय संत होत. संत रविदास यांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ मध्ये काशी येथे झाला. रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्या आहेत. रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते.
पराधिनता पाप है जान लेहु रे मीत
रविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत
सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती.रविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणार्यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडले आहे.
एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा
रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा
सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.
समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद खालील ओळीतूनही दिसून येतो.
ऐसा चाहो राज्य में, जहां मिले सबन को अन्न
छोट बडो सब सम बसे रविदास रसे प्रसन्न
विश्वगुरू बसवण्णा यांनी कायक व्ये कैलास म्हणून श्रमाला प्रतिष्ठा दिली तसेंच रविदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. रविदास काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चालण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. 'मन चंगा तो कठोती में गंगा' मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे. थोर अशा भारतीय संत संप्रदायाला महत्वाचे स्थान असल्याने त्यांचे विचार प्रत्येक देशातील नागरिकांनी आचरणात आणले पाहिजेत. यावेळी मुबारक नदाफ, रविंद्र सोलनकर, सिध्देश्वर माळी, अर्जुन कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.