नवी दिल्ली: बिहारच्या धर्तीवर राज्य सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केली.
बिहार सरकारने नुकतीच जातीनिहाय जनगणना सुरू केली आहे. हे योग्य पाऊल असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकर म्हणाले, विकासाचे नियोजन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना होण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत जातीच्या आधारावर असलेले अनेक गृहउद्योग नष्ट पावले. या समूहातील व्यक्ती अर्थार्जनासाठी नेमके आता काय करीत आहे?, हे केवळ या जातीनिहाय जनगणनेतून स्पष्ट होणार आहे. यामुळे बिहार सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा हा निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.