‘अ’ गटात कु.अवंती सिंजनगुडे ‘ब’ गटात तर्नूम अन्सारी प्रथम
वक्तृत्व स्पर्धेतही मुलीच आघाडीवर
नागपूर, दि.१३ (प्रति) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने “ ओबीसींचे संवैधानिक अधिकार व ओबीसी विद्यार्थी आणि युवाकांपुढील आव्हाने “ या विषयावर आयोजित “ ओबीसी महावक्ता – २०२३ “ ही वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी धनवटे नॅशनल कॉलेज, कॉंग्रेस नगर येथील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात थाटात पार पडली. सकाळी १० वाजता या स्पर्धेचे रीतसर उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी ओबीसी महापुरूषांच्या संयुक्त प्रतिमेला माल्यार्पण व द्विप प्रज्वलन करून केली. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, माजी आमदार व ओबीसी किसान महासंघाचे मार्गदर्शक दिगाबंर विशे ,सहसचिव प्रा.शरद वानखेडे व या स्पर्धेचे संयोजक प्रा.आशीष तायवाडे उपस्थित होते. प्रारंभी प्रा.आशीष तायवाडे यांनी प्रस्ताविकेतून या स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका मांडत ओबीसी लोकांमधून चांगले वक्ते निर्माण व्हावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे स्पष्ट केले.उद्घाटनीय भाषणात अतुल लोंढे यांनी अशा स्पर्धेमुळे तरुण मंडळींचा आत्माविश्वास वाढतो आणि त्यांच्यात शक्ती निर्माण होते व आज अशा उपक्रमांची गरज ही ओबीसी युवकांना असल्याचे स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षीय संबोधनात डॉ. तायवाडे यांनी ओबीसी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा व्यक्तित्वविकास स्पर्धेचे आयोजन महासंघातर्फे सातत्याने करण्यात येईल अशी ग्वाही देत स्पर्धेला सुरुवात केली.
स्पर्धेला सुरुवात होताच विचारमंचावर या स्पर्धेचे परिक्षक मंडळी प्रा.डॉ.कोमल ठाकरे, प्रा. आनंद मांजरखेडे, पत्रकार प्रवीण विघरे, सचिन राजूरकर व रूशब राऊत स्थानापन्न होताच स्पर्धेला सुरवात झाली. दोन्ही गट मिळून जवळपास ५३ स्पर्धक या स्पर्धेतन संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झाले होते.
स्पर्धेची सुरुवात ही ‘अ’ गटातील १५ ते २० वर्षे वयोगटातील स्पर्धने झाली. पहिल्याच १६ वर्षीय स्पर्धकाने विषयाच्या अनुषंगाने दिलेल्या पाच मिनिटात दर्जेदार भाषण करून सभागृत भरगच उपस्थित असलेल्या श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत स्पर्धकांनी विषयाला धरून एकापेक्षा एक सरस स्पर्धक या अ गटात आपले वक्तृत्व सादर करीत विषयाला न्याय देण्यासाठी स्पर्धा करीत होते. इतके उत्कृष्ट वक्ते हे ओबीसी लोकांमध्ये आहेत याचा सर्व उपस्थिताना अभिमान वाटत होता. चांगल्या मांडणीमुळे कोण श्रेष्ट ? हा प्रश्न परिक्षकांसह सर्वच उपस्थित श्रोत्यांना पडला होता. एक से बढकर एक अशा स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धने स्पर्धकांसह उपस्थित श्रोत्यांच्या मनात चुरस निर्माण केली होती . वयाने लहान पण कालगुणाने ओतप्रोत अशा स्पर्धकांच्या सहभागामुळे वातावरण आनंदाने भारावून गेले होते. विषयाला न्याय देत मांडणी होत असल्यामुळे उपस्थित ओबीसी बांधवांचे संवैधानिक प्रबोधनही होत होते. दुपारी भोजन अवकाशानंतर ‘ब’ गटातील २१ ते वर्षे वयोगटातील स्पर्धेला सुरुवात झाली. या गटातही विषयाला धरून स्पर्धकांनी उत्कृष्ट मांडणी केली व स्पर्धेतील चुरस अधिकच वाढविली. ओबीसींचे संवैधानिक अधिकार काय आहेत ? याची मांडणी तरुण मंडळी करीत आहे यामुळे सर्व उपस्थित श्रोते भारावून गेले होते.
शेवटी सायंकाळी उशिरा स्पर्धेच्या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह प्रमुख पाहुणे व विविध पारितोषिकांचे प्रायोजक नरेंद्र जिचकार, नरेश बरडे, वृंदाताई ठाकरे, परिणिता फुके, मोहन गायकवाड, विजय ठाकरे व परीक्षक मंडळी विराजमान झाले. स्पर्धक व उपस्थित श्रोत्यांबरोबर परीक्षकाच्या वतीने प्रा.डॉ.कोमल ठाकरे, सचिन राजूरकर, प्रवीण विघरे, रूषभ राऊत, प्रा.आनंद मांजरखेडे यांनी संवाद सादत सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.डॉ. तायवाडे यांनी स्पर्धेच्या यशाचे श्रेय ओबीसी कार्यकर्ते, संयोजक चमू, प्रायोजक व सहभागी स्पर्धकांना देत सर्वांचे सहकार्याबद्दल अभिनंदन केले. परीक्षकाच्या वतीने प्रा.डॉ.कोमल ठाकरे व प्रा.आनंद मांजरखेडे यांनी मनोगत व्यक्त करीत सहभागी स्पर्धक व आयोजकांचे आभार मानलेत.
शेवटी स्पर्धेचे आयोजक प्रा.आशिष तायवाडे यांनी या स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम तीन उत्कृत्ष्ठ विजेत्यांची नावे जाहीर करून उपस्थितांमध्ये उत्कंठा निर्माण केली. १५ ते २० वर्षे ‘अ’ वयोगटातील प्रथम पारितोषिक रुपये ११००० रोख, कु.अवंती उमेश सिंजेनगुडे (भंडारा) हिने तर द्वितीय पारितोषिक रुपये ७००० रोख कु. पल्लवी मधुसुधन शेंडे (भंडारा) हिने तर तृतीय पारितोषिक रुपये ५००० हे कु. प्रांजली मेश्राम (नागपूर) हिने पटकाविले . २१ ते ३० वर्षे ‘ब’ वयोगटातील प्रथम पारितोषिक रुपये ११००० रोख कु.तर्नुम अंसारी (नागपूर) हिने तर द्वितीय पारितोषिक रुपये ७००० रोख श्री विकास मानकर(नागपूर) याने पटकाविले तर तृतीय पारितोषिक रुपये ५००० हे कु वैशाली रणदिवे (नागपूर) हिने पटकाविले .
या सर्व प्रतिभावंत विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व भारतीय संविधानाची प्रत ही या पारितोषिका सोबत सन्मानाने पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून यावेळी गौरविण्यात आले समारोहिय समारंभाच्या शेवटी प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकांनी प्रातिनिधिक भाषण करून पुन्हा सर्वांचे मने जिंकलीत.
या स्पर्धेच्या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहराध्यक्ष परमेश्वर राऊत यांनी केले. आभार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश महासचिव राजेश काकडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशश्वीतेसाठी विनोद हजारे , ऋतिका डाफ, निलेश कोढे, शुभम वाघमारे, पराग वानखेडे, डिम्पल महल्ले, रुपेश राऊत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध आघाडींचे संपूर्ण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan