चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्याचे सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. जनगणनेच्या आकडेवारीचा राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी अनेक ओबीसी संघटना करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारचे गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी लोकसभेत ओबीसीची जतनिहाय जनगणना करणार नाही असे व्यक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. महाराष्ट्र सरकारने तसा ठराव ९ जानेवारी २०२० साली तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला होता. तो ठराव भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सहित सर्व पक्षांनी एकमताने विधानसभेत मंजूर केला होता. त्याचीच अंमलबजावणी शिंदे फडणवीस सरकारने त्वरित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक सचिन राजूरकर, कर्मचारी संघटनेचे रामराव हरडे, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे रवींद्र टोंगे, युवा महासंघाचे प्रकाश चालुलकर, तालुका अध्यक्ष गणेश आवारी, प्रशांत पिंपळशेंडे, भूवन चिने, अतुल मोहितकर, रंगराव पवार, अभिषेक मोहुर्ले, रोहित मोहुर्ले, नमिता पाटील, सानिका लेनगुरे, अंजली कौरसे, प्रेम वाळके उपस्थित होते.