नागपूर: बिहार राज्यात ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगणना तेथील राज्य सरकारने सुरू केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. १२ जानेवारी रोजी धनवटे नॅशनल कॉलेज येथील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ होते.
यावेळी विचारमंचावर राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर, सहसचिव शरद वानखेडे, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे मार्गदर्शक माजी आमदार दशरथ विशे विराजमान होते. यावेळी वरूड परिसरात महासंघाचे प्रभावी कार्य करणारे प्रवीण वानखेडे व नागपूर ग्रामीण भागात विशेष जागृती करणारे राजू चौधरी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच विविध आघाड्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी घोषित करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध जिल्ह्यांतील सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत कोकण विभाग अध्यक्ष एकनाथ तरमले, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, ओबीसी अधिकारी, कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले, किसान महासंघाचे अध्यक्ष प्रकाश साबळे, युवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे, महिला महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा कल्पना मानकर व ज्योती ढोकणे, प्रतिभा चौधरी, मंगला देशमुख, विजया धोटे, वर्ष होगे, शेहाल जमकर, लीना कटरे, रामभाऊ इरखेडे, शाम लेंडे, रमेश नाईक, गुणेश्वर आरीकर, अनिल ठाकरे यांच्यासह अनेकांनी विविध समस्यांवर प्रभावी मांडणी केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन मुंबईला येत्या दोन महिन्यांत घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले. बैठकीत ओबीसींना महाराष्ट्रात भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी करावयाच्या कृतिशील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याचे विविध आघाड्यांना सांगण्यात आले. प्रारंभी प्रदेश महासचिव राजेश काकडे यांनी बैठकीची भूमिका मांडली. संचालन श्रुतिका डाफ यांनी केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan