बारामती : मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे साहित्य घराघरांत पोहोचविण्याचे काम होत आहे. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रात संपुष्टात आणण्याचे काही लोकांचे मनसूबे उद्ध्वस्त झाले आहेत. बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी आपण ही पुस्तके वाचली पाहिजेत, असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.
बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांनी सुरू केलेल्या 'बहुजन प्रेरणा' पुस्तकालयाचे उद्घाटन बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मेश्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी मेश्राम यांनी संपूर्ण पुस्तकालयाची पाहणी करून अहिवळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
मेश्राम म्हणाले, चळवळीतील प्रत्येकासाठी ही पुस्तके प्रेरणादायी असून, आपण ती नुसती खरेदी न करता त्याच वाचनदेखील केलं पाहिजे, असं परखड मत मांडत त्यांनी विविध विषयांवर उपस्थितांना संबोधित केलं
याप्रसंगी बामसेफचे जिल्हाध्यक्ष आनंद थोरात, भारत मुक्ती मोर्चाचे प्रचारक सचिन बनसोडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिन वगळता इतर दिवशी बहुजन महापुरुषांची ही पुस्तके कुठेही मिळत नाहीत. त्यामुळे बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण हे पुस्तकालय सुरु केलं आहे. या ठिकाणी बहुजन महापुरुषांच्या कार्यावर आधारित वैचारिक आणि प्रबोधनात्मक पुस्तके मिळतील अशी माहिती अॅड. सुशील अहिवळे यांनी दिली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan