वणी : ओबीसींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जातनिहाय जनगणना हाच एकमेव पर्याय आहे, असे मत विचारवंत तथा लेखक प्रा. हरी नरके यांनी येथे व्यक्त केले. बेलदार समाज बहुद्देशीय संस्था वणीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी तथा महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा. सा. कन्नमवार यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी येथील गव्हर्नमेंट शाळेच्या खुल्या प्रांगणात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
'विशेष मागासवर्गासाठी ओबीसीची जनगणना करणे काळाची गरज' हा व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार होते. उद्घाटक म्हणून माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, माजी सभापती राकेश बुग्गेवार, डॉ. शिरीष कुमरवार, शैलेश तोटेवार, अलका दुधेवार प्रामुख्याने उपस्थित होते. व्याख्यानाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची शासकीय जयंती न होणे ही न पटणारी गोष्ट आहे. आतापर्यंत त्यांचे शासकीय ग्रंथ, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा धडा बालभारतीमध्ये यायला पाहिजे होता. मात्र तसे झाले नाही, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. ओबीसी जनगणनेला आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना पाठिंबा दिला होता. संविधानाद्वारे ओबीसींना दिला गेलेला वाटा हा मिळायलाच पाहिजे. आता पंतप्रधानांनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आहे. आता जेव्हा संविधानिक अधिकार आहे तर मग जातनिहाय जनगणना का होऊ नये ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सूत्रसंचालन उमाकांत जामलीवार यांनी केले, तर प्रास्ताविक गजानन चंदावार यांनी केले.