मुंबई - 'मंटो हा काळाच्या पुढचे लिहिणारा लेखक होता. त्याला भारत-पाकिस्तानच्या सीमांचे बंधन नाही. दोन्ही देशांची सीमा त्याला रोखू शकलेली नाही. त्याने ६० ते ७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या दीर्घकथा, लघुकथा आजही तितक्याच जिवंत आहेत. त्या कथांमधील धर्म, दंगली, धर्मांधता, मानवी नातेसंबंध हे विविध पैलू आणि त्यांचे संदर्भ आपल्या आसपास असल्याचा भास होतो,' अशा शब्दांत मंटोचे अभ्यासक मोहम्मद असलम परवेज यांनी 'सआदत हसन मंटो यांच्या लघुकथा' या पुस्तकाचा गौरव केला. फाळणीनंतर पाकिस्तानला गेलेल्या मंटोने तिथे उर्दूमध्ये ३२ लघुकथा लिहिल्या. या कथांचा कवी अशी लोकनाथ यशवंत यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रगतीशील लेखक संघ आणि उर्दू कारवाँ या संस्थांतर्फे परळ येथील दळवी इमारतीमधील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झाले. यावेळी पत्रकार फरहान हनीफ हाश्मी, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुबोध मोरे, कॉ. डॉ. श्रीधर पवार, फरीद खान उपस्थित होते.
'कवी लोकनाथ यशवंत यांनी अनुवादित केलेल्या कथा स्वतः मंटोनेच मराठीत लिहिल्या आहेत की काय, इतका उत्तम अनुवाद झाला आहे. मंटोची प्रत्येक कथा मानवी जीवनाच्या तळाला स्पर्श करून जाते. मंटो जगलेला काळ. फाळणीच्या वेदना, त्याचे मुंबईशी असलेले नाते त्याच्या साहित्यातून डोकावत असते. मंटोची स्वतःची अशी एक दृष्टी आहे. ती मराठी अनुवादात स्पष्टपणे दिसून येते,' असे मत परवेज यांनी व्यक्त केले.
लोकनाथ यशवंत यांनी या कथांचा अनुवाद करण्यामागची प्रेरणा मंटो हेच असल्याचे तसेच मंटो आपला जीवासखा वाटत असल्याचे नमूद केले. नागपूर येथील महाल भागात एका दंगलीत अडकल्याचा भीषण अनुभव त्यांनी कथन केला. 'भारत- पाकिस्तान फाळणीच्या जखमा मंटोच्या उराशी कायम ठसठसत होत्या. माझा दंगलीतील अनुभव हा मंटोच्या जातकुळीशी नाते सांगणारा मला वाटला. या शिवाय मंटोच्या कथांचे त्यातील मोठ्या आशयाचे गारुड अनेक वर्षांपासून मनात रुतून बसले होते,' असे ते म्हणाले. फरहान हनीफ हाश्मी यांनी मंटोच्या निधनानंतर भारत आणि पाकिस्तानात वृत्तपत्रात आलेल्या निवडक बातम्या आणि लेखांचे तर वैभव छाया, अविनाश उषा वसंत, मयुर येवले, सुधीर काकडे, स्वप्नील पात्रे यांनी लघुकथांचे वाचन केले.
डॉ. श्रीधर पवार यांनी मंटो आणि मुंबई असा जीवनपट उलगडून दाखवला. मंटो राहत असलेला क्ले रोडवरील नागपाड्यातील भाग, सारवी हॉटेल. तसेच या परिसरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील साहित्य चळवळ, पुरोगामी लेखकांचा अड्डा, कम्युनिस्ट चळवळ अशी रंजक माहिती दिली. मंटोचे नागपाडा येथील घर, माहीम दर्गा व मंटोशी संबंधित मुंबईतील ठिकाणांची लवकरच एक सफर काढणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ. पवार यांनी दिली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan