- अनुज हुलके
यंदा वर्धा येथे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. ही पुरोगामी साहित्यिक आणि परिवर्तन चळवळीतील तमाम बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन वर्धा नगरीत असल्याने त्या साहित्य संमेलनाच्या समांतर विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची परंपरा यंदाही कायम राखली जात आहे. सन १९९९ ला विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रात विद्रोहीचा प्रभाव प्रचंड वेगाने वाढू लागला.विद्रोही सांस्कृतिक चळवळ अग्रेसर होत आतापर्यंत आयोजित करण्यात आलेली सर्वच विद्रोही साहित्य संमेलनं, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीस तोड ठरलीत.
वास्तविक पाहता विद्रोहाची ही परंपरा फार प्रदीर्घ पुरातन अशी आहे.'विद्रोही' या शब्दाचा अर्थ 'अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे'असा आहे.'द्रोही' या शब्दाच्या अर्थाशी त्याचा काहीही संबंध नाही.(विद्रोही तुकाराम, लेखक डॉ. आ.ह. साळुंखे) विद्रोही प्रवाह साहित्य संमेलनापुरता आकुंचित देखील नाही.या व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकलेले एकलव्य, शंभूक यांच्या विद्रोहाची धार, वर्णजातीव्यवस्थेवरील चार्वाक, महावीर, बुद्ध यांचे वार. बसवेश्वर चक्रधर, कबीर,तुकाराम, गाडगेबाबा यांचे घणाघाती विचार. लिंगायत, महानुभाव,वारकरी संत चळवळीचा प्रचार प्रसार. हा समस्त विद्रोह मानवतावादी मूल्यांच्या बाजूचा.सामाजिक न्यायासाठी काळानुरूप आविष्कार होत आलेला विद्रोह होय. शक, कुशान,हून, मुघल, डच, पोर्तुगीज आणि आंग्ल सत्ता विराजमान झाल्यात् पर आर्य आक्रमणामुळे स्थापित झालेली सत्ता नि त्याविरुद्ध लढलेला समतेचा संगर कायमच अस्तित्वात राहिला आहे.
एकोणिसाव्या शतकातील ज्ञानाचा प्रस्फोट,विज्ञान,तंत्रज्ञान, शोध संशोधन यातील उत्तुंग झेप आणि, सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक अशी स्थित्यंतरं पुराणमतवादी तत्वज्ञानासमोर आव्हान म्हणून उभे राहिलेत.आणि सामाजिक परिवर्तनासाठी विद्रोह अधोरेखित होत गेला. सामाजिक सुधारणांना स्विकाराहार्यता येत असताना साहित्याचा अवकाश व्यापत गेला. रानड्यांनी पुढाकार घेऊन मराठी ग्रंथकार सभेचे दुसरे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सहभागी होण्यासाठी महात्मा फुलेंना पत्र पाठवून विनंती केली होती. त्या पत्रास म. फुल्यांनी पाठविलेले उत्तराचे पत्र विद्रोहीचा वैचारिक पाया आहे. मराठी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या सदर पत्रात म. फुल्यांनी सहभागी होण्याबाबत सपशेल नकार दिला.(महात्मा फुले समग्र वाङ्मय, संपादक हरी नरके, महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन,मुंबई) ज्या सारस्वतांच्या पूर्वजांनी आमच्यावर सूड उगवण्याच्या इराद्याने हजारो वर्षे ग्रंथनिर्मिती केली.त्या वैदिक ब्राह्मणी साहीत्याच्या परिष्कृत, प्रक्षिप्त आवृत्त्या काढून अमानुष अशी वर्णजातव्यवस्था उदंड- उन्मत्त होण्यासाठी पिढ्यान् पिढ्या जे खपत आलेले आणि त्याविरोधात मानवी हक्कासाठी उभे ठाकलेल्यांचे ग्रंथ यात कुठलाही मेळ बसू शकत नाही.असे बिनधास्तपणे बंधुप्रितीच्या भाषेत 'माझ्या घालमोड्या दादा'स परखड उत्तर देत पत्राशेवटी 'आपला दोस्त' असा स्वतःचा उल्लेख करतात. विद्रोहाची ही भूमिका अनेक अर्थाने मैलाचा दगड ठरते. 'ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणाशी।।
धरावे पोटाशी।। बंधूपरी।।' असा एकमय राष्ट्रनिर्मितीचा कैवार घेत म.फुलेंनी केलेली शैक्षणिक कार्याची आरास जितकी विद्रोही आहे, त्यापेक्षा सामाजिक परिवर्तनाची धरलेली कास प्रचंड क्रांतिकारक आहे. तर धर्मग्रंथाची चिकित्सा अन् धर्मस्वातंत्र्याची आस; अवैदिक सांस्कृतिक वारसा, सत्यशोधक समाजाची स्थापना, सार्वजनिक सत्यधर्म त्यावरील कळस आहे.
आर्यब्राम्हणांच्या मतलबी ग्रंथांतील दांभिकपणा आणि कलमकसायांनी शुद्रातिशुद्रांना गुलाम करण्यासाठी रचलेली कुभांडं ध्यानात यावीत म्हणून घातलेला शिक्षणाचा पाया, बालहत्याप्रतिबंधग्रुह, विधवा विवाह, केशवपन विरोध,पाण्याची विहीर खुली करणे, सत्यशोधक लग्न विधी, शेती आणि शेतकरी यांच्या क्रांतीचे चिंतन अशी पर्यायी मांडणी.व्यवस्थेलाच हादरून सोडणारा केवढा हा विद्रोह.
तृतीय रत्न नाटक, छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी हे पवाडे, ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी,शेतकऱ्याचा असूड,सत्सार, इशारा,सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह, सर्व पूजा विधी, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक, अखंडादि काव्यरचना, पत्रव्यवहार, निवेदने,अहवाल, पत्रकं असं वाङ्मयीन प्रकार ज्या ताकदीने निर्माण केले;सहकारी नारायण मेघाजी लोखंडेसह दीनबंधूची सुरुवात केली.पुढील काळातही तो साहित्य प्रवाह सत्यशोधक ब्राम्हणेतर चळवळीतील छत्रपती शाहू महाराज ते गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत आणि तदनंतर साहित्य निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होऊ लागली. काव्य फार्स पद पोवाडा शाहिरी गजल कवण भजन लावणी नाट्य कथा कादंबरी चरित्र समिक्षण चिकित्सा विडंबन स्फूट वैचारिक साहित्य इ प्रकारच्या विपुल साहित्य निर्मितीतून विद्रोही प्रवाह विराट होत आहे; दलित आदिवासी ग्रामीण श्रमिक भटके ओबीसी स्त्रीवादी इ.साहित्य प्रवाहांची सत्यशोधकी प्रेरणा संत साहित्य, शिक्षक साहित्य संमेलनाच्या विस्तारात विद्रोहीची रेषा लांब होतानाच दिसते.
वैदिकांच्या साहित्यातून रुजवलेल्या वर्णजातीव्यवस्थेला लोकायत, जैन, बौद्ध,लिंगायत, शिख, महानुभव,वारकरी या धर्म- पंथांचं तत्त्वज्ञान विविध वाङमय प्रकारांच्या उत्तुंग राशींतून जनमानसात सालोसाल विद्रोहाची पेरणी करत आहे. बहुसंख्येने असलेल्या या श्रमिक वंचित समाजाच्या अभिव्यक्तीला अखिल भारतीय साहित्य समजलं जाते स्थान काय? शेतकरी आत्महत्या, श्रमिक शोषण,धार्मिक गुलामी, बेरोजगारी, सांस्कृतिक लढे,जातीय तिढे,धर्मांधता, उच्चजातवर्चस्व ही कोडी कधी सुटणार? प्रस्थापित घालमोड्या दादांच्या साहित्यातून या प्रश्नाचे जवाब मिळू शकतील ?
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले. ते यशस्वी झाले नाही. ग्रंथकार जातीने थोडे आले होते.जे आले होते त्यांची सरबराई योग्य रीतीने झाली नाही. संमेलन एका दिवसात आटोपले. प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या आयोजनाला भरमसाट आर्थिक मदत आणि सर्व यंत्रणा दिमतीला असतात आणि विद्रोही साहित्य संमेलन लोकसहभागातून यशस्वी होतात. कष्टातून धनधान्य संपदेची उपज करणारे सर्जनशील, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवप्राप्त, श्रमण संस्कृतीचे पाईक विद्रोही, साहित्याचा मुख्य प्रवाह आहे.
वर्धा येथील १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. यापूर्वीही या शहरात झालेली साहित्य संमेलने व वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम धमाल उडवून गेलेत.या संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ अशोक चोपडे यांना प्रबोधन चळवळीचा दीर्घानुभव गाठीशी आहे. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितेश कराळे सरांच्या कौशल्यपूर्ण शैलीने या संमेलनाचे यश निश्चितच द्विगुणित होईल.विद्रोही सांस्क्रुतिक चळवळीचे प्रा प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले यांच्या मार्गदर्शनात यासाठी सर्वत्र सुरु असलेली- सभा बैठका प्रचार -धडपड हुरूप वाढवणारा आहे.प्रस्थापितांच्या नाकावर निंबू टिचून विद्रोही साहित्य संमेलन भरविले जाते. एकिकडे सरकारी यंत्रणा इतमामात,शासकीय प्रशासकीय द्रव्ये- मनुष्यबळ वापरून प्रस्थापित साहित्य संमेलनात मिटक्या मारत जेवनावळी उठवणे,समाजमन विषाक्त करणारे गळाभेट, आलिंगन हारतुरे दे-घे करून सोहळे साजरे होताना. सामान्य कष्टकरी श्रमिक समाजाच्या वेदनांकडे मूकदर्शक बनून भाटगिरीत रमणाऱ्या साहित्यक्रुतीला विद्रोही साहित्य संमेलनाचा संवेदनशील मांडव बजावत आहे की, समता न्याय बंधुभाव मूल्यांचा पुरस्कार करणारा मानवतावादी विचार मुख्य प्रवाह ठरणार. विद्रोही प्रवाह ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक महिला ग्रामीण आदी जनवादी जीवनाची मुख्य जीवनधारा आहे.विद्रोहाची, चैतन्याची,आंदोलनाची भूमी असलेल्या वर्धा नगरीत विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनाने हा लढा आणखी व्यापक होईल.
२०२३ हे वर्ष अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. यावर्षी सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.भारतीय स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव याच वर्षी आहे. दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे एक चैतन्यमय वातावरण निर्मिती होईल.अशा सामाजिक पर्यावरणात विद्रोही साहित्य संमेलनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते.
- अनुज हुलके
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan