वर्धा, सर्कस मैदानाच्या प्रांगणात ५ फेब्रुवारी २०२३ मध्ये १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकमय राष्ट्रनिर्मितीचा पुरस्कार, सनातनी प्रवृत्तीला विरोध, सांस्कृतिक विविधतेचा व संविधानाचा सन्मान ही या संमेलनाची मुख्य सूत्रे आहेत. या संमेलनात पुस्तकविक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुंबईत धारावी येथे १९९९ साली बाबुराव बागुल या थोर साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनापासून आजवरच्या १६ संमेलनांमध्ये पुस्तक प्रदर्शन व विक्री हे विद्रोही साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
म. फुलेंच्या साहित्य व वाङ्मयविषयक भूमिकेवर आधारित, एकमय राष्ट्र निर्मितीचा पुरस्कार, सनातनी प्रवृत्तीला विरोध, सांस्कृतिक विविधतेचा व संविधानाचा सन्मान या मुख्य सूत्रांवर वर्धा येथे भरणाऱ्या या संमेलनात हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा दिसणार आहे. विचारी- वर्धेतील आंदोलनजीवी - कष्टकरी जनता पदरमोड करत पुस्तके खरेदी कारण्याची फुले-शाहू-आंबेडकरी परंपरा दाखवणार आहे. या १७ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात हीच जनता पुस्तक खरेदीचा नवा उच्चांक करणार असल्याची अपेक्षा राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले, संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी व्यक्त केली आहे. या संमेलनात ग्रंथप्रदर्शन व विक्रीसाठी १५ बाय १५ चौरस फुटांचा स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे.