वर्धा. ब्युरो येथे सर्कस मैदानाच्या भव्य प्रांगणात 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी 17 वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. एकमय राष्ट्रनिर्मितीचा पुरस्कार, सनातनी प्रवृत्तीला विरोध, सांस्कृतिक विविधतेचा व संविधानाचा सन्मान ही संमेलनाची मुख्य सूत्रे आहेत. या संमेलनात पुस्तकविक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मुंबईत धारावी येथे 1999 साली बाबुराव बागुल या थोर साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनापासून आजवरच्या 16 संमेलनांमध्ये पुस्तक प्रदर्शन व विक्री हे विद्रोहीचे वैशिष्ट्य राहिले आहे. म. फुलेंच्या साहित्य व वाङमय विषयक भुमिकेवर आधारित, एकमय राष्ट्रनिर्मितीचा पुरस्कार, सनातनी प्रवृत्तीला विरोध, सांस्कृतिक विविधतेचा व संविधानाचा सन्मान या मुख्य सुत्रांवर वर्धा येथे भरणाऱ्या या 17 व्या संमेलनात हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा दिसणार आहे.
वर्ध्यामधील विचारी आंदोलनजीवी- कष्टकरी जनता पदरमोड करत पुस्तके खरेदी कारण्याची फुले-शाहू- आंबेडकरी परंपरा दाखवणार आहे. या 17 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात हीच जनता पुस्तकखरेदीचा नवा उच्चांक करणार असल्याची अपेक्षा राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले, संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी व्यक्त केली आहे.
या संमेलनात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी 15 बाय 15 चौरसफुटाचा स्टॉल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दोन दिवसांसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाईल. प्रथम शुल्क भरून नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या पध्दतीने स्टॉल्स वाटप केले जाईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष नितेश कराळे व संयोजक अशोक चोपडे यांनी दिली आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan