औरंगाबाद सारे जग आता कार्ल मार्क्सकडे झुकत आहे. आता भारतात येत्या निवडणुकीत परिवर्तनाची एक चांगली संधी मिळणार आहे. डावे, आंबेडकरवादी, दक्षिणेकडील पक्ष मिळून हे परिवर्तन घडवू शकतात. आज डावे पक्ष कमकुवत झाले असले तरी तेच या देशाला तारू शकतात, असा आशावाद प्रख्यात वक्ते व विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी रविवारी व्यक्त केला.
तापडिया नाट्य मंदिरातील कॉ. मनोहर टाकसाळ साहित्य नगरी येथे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात ते "भारतीय संसदीय राजकारणाची सद्य:कालीन दिशा' या विषयावर बोलत होते.
कसबे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रभाकर आडसूळ यांनी त्यांचे स्वागत केले. दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. विवेक जैस्वाल यांनी आभार मानले.
गोविंद पानसरे यांनी प्रागतिक चळवळीला गतिमान केले, असे सांगत रावसाहेब कसबे म्हणाले, 'आज संपूर्ण जगाला भयाने ग्रासले आहे. श्रीमंत माणूसही तणावग्रस्त आहे. जगात दुःख, विवंचना का आहे? याची उत्तरे आपल्यालाच शोधावी लागतील. कार्ल मार्क्सने दुखाची कारणे शोधली. बुद्धांनीही कारणे शोधली.
निसर्गाचे जो शोषण करतो तो श्रीमंत देश असे दिसून येते. निसर्ग सुरक्षित ठेवा व निसर्ग निरिंद्रीय शरीर आहे, हे तत्त्वज्ञान मार्क्सने सांगून ठेवले आहे. आताचे जग मार्क्सवादाकडे झुकायला लागले आहे. गांधी, नेपोलियन आदींनी प्रस्थापित समाज शक्तीवर स्वार होऊन काहीतरी करून दाखवले, तर दुसरीकडे प्रस्थापित शक्तीविरुद्ध काम करणारे लेनिन, नेहरू, डॉ. आंबेडकर असेही महापुरुष आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माणसाच्या स्वार्थात सरकारने हस्तक्षेप करू नये, यांचे नाव भांडवलशाही. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था नव्हे. ती सर्वव्यापी आहे. ती सामाजिक व्यवस्थाही आहे. माणसाला जगण्याचे प्रयोजन देणे, हा मार्क्सचा प्रयत्न होता. लोकशाहीचे मूळ भांडवलशाहीत असून, लोकशाहीची रूपेही बदलत गेली, असे कसबे यांनी सांगितले.
सकाळी 'भारतीय साहित्य, मराठी साहित्य, डाव्या चळवळी आणि प्रगतिशील लेखक संघ' या विषयावर सांगलीचे जी. के. ऐनापुरे यांची मुलाखत घेण्यात आली. 'अण्णा भाऊ साठे आणि वर्तमानकालीन अस्मितेचे राजकारण' या विषयावर डॉ. महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यात डॉ. दत्ता घोलप, डॉ. प्रवीण बनसोड, महादेव खुडे यांची भाषणे झाली.
डॉ. मुस्तजीब खान यांच्या अध्यक्षतेखाली 'समांतर सिनेमाने डाव्या चळवळीला फसवले का?' या विषयावर परिसंवाद झाला. त्यात अधीर सपकाळ व डॉ. बापू चंदनशिवे यांनी सहभाग घेतला. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan