मडगाव (गोवा) : गोव्यात मुख्यालय असलेली सनातन संस्था धार्मिक विद्वेष पसरवित असून डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी या तिन्ही विचारवंतांच्या हत्यांमागे याच संस्थेच्या साधकांचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. या तिन्ही विचारवंतांच्या खुन्यांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी खास न्यायालयाची स्थापना करावी, अशा ठरावासह एकूण नऊ ठराव येथील दक्षिणायन राष्ट्रीय अभिव्यक्ती परिषदेत संमत करण्यात आले. तीन दिवसांच्या परिषदेचा रविवारी समारोप झाला. परिषदेत देशभरातील विचारवंत, लेखक, कलाकार यांनी अभिव्यक्तीवरील संकोच, धार्मिक विद्वेषाचे वाढते राजकारण, दलितांची होणारी गळचेपी, कलाकार व लेखकांवरील दडपण आणि देशात दुषित होत चाललेल्या सामाजिक वातारणावर चिंताही व्यक्त केली.