वर्धा येथे झालेल्या साहित्यिक, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्रोही संमेलनाच्या संदर्भातील संयोजनाच्या प्राथमिक बैठकीत वर्धा शहरातील नियोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सविधानाचे अभ्यासक व शिक्षण विचारक, प्रा. नितेश कराळे व मुख्य संयोजक पदी सत्यशोधक डॉ. अशोक चोपडे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा आयोजित पत्रकार परिषेदेत विद्रोही चळवळीचे राज्यसंघटक किशोर ढमाले यांनी केली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी विचारांची पेरणी करते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आजपर्यंत मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, पुणे, मनमाड, बुलढाणा, धुळे, नाशिक, परभणी, उदगीर इत्यादी ठिकाणी एकूण १६ विद्रोही साहित्य संमेलने आणि एक निपाणी कर्नाटक येथे आंतरराज्य विद्रोही साहित्य संमेलन झाले. एक विद्रोही स्त्री साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड, डॉ. तारा रेड्डी, तुळशी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, उर्मिला पवार, संजय पवार, जयंत पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिमा अहिरे डॉ. आनंद पाटील,गणेश विसपुते, यांच्यासारख्या मान्यवर सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत. सनातनी प्रवृतीला विरोध एकमय राष्ट्र निर्मितीचा पुरस्कार, सांस्कृतिक विविधतेचा व संविधानाचा सन्मान ही संमेलनाची मुख्य सूत्रे आहेत.
वर्धा जिल्हाचा सत्यशोधकी, गांधीवादी, आंबेडकरी ऐतिहासिक वारसा हे या संमेलनाचे वैशिष्ट्य राहणार आहे. महात्मा फुलेकृत सत्यशोधक समाज स्थापनेचा शतकोत्तर महोत्सव व राजर्षी शाहू स्मृती शताब्दीला हे संमेलन अर्पित करण्यात आहे. या संमेलनातील परिसंवाद गटचर्चा, मुलाखत, कवी संमेलन, नाटक, पथनाट्य, नाटिका, सत्यशोधक जलसा या द्वारे होणारे विचार मंथन विद्रोही साहित्याच्या निर्मिती आणि सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनामध्ये मोलाची भर टाकणारे ठरेल. असा विश्वास आजच्या पत्रकार परिषेदेत व्यक्त करण्यात आला. वर्चस्ववादी संस्कृतीच्या विरोधात समतावादी पर्यायी, साहित्य संमेलन म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाकडे पाहण्यात येत आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे राज्य संघटक किशोर ढमाले, व पदाधिकारी अजित देशमुख ( मुंबई ), प्रा. रामप्रसाद तौर (नांदेड), अर्जुन बागुल (नाशिक) आदी उपस्थित होते.
वर्धा येथे नियोजित १७ व्या विद्रोही संमेलनाच्या स्वागत समितीचे मुख्य पदाधिकारी म्हणून गजेंद्र सुरकार, सुधीर गिन्हे, गुणवंत डकरे, राजेंद्र कळसाईत, प्रा. जनार्दन देवतळे, कपिल बुटे, श्याम शंभरकर, नरेंद्र पहाडे, विशाल चौधरी, मोहित सहारे, गोविंदा पारिसे, अजय भेंडे, नंदकुमार वानखेडे विजय नाखले, अशोक कांबळे, डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. सुधाकर सोनवणे, डॉ धनंजय सोनटक्के, प्रा. एकनाथ मुरकुटे, रवींद्र कडू, किरण झाडे, पुष्कर बंडावार, शंकर घपाट, राजेश खडसे, निखील मोरेश्वर, संदीप चिचाटे, संदीप काळबांडे, सुमेध बनसोड, अनिल इंगळे, श्रिया गोडे, यांची विविध पदांवर निवड करण्यात आल्याची माहिती यावेळेस देण्यात आली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan