नागपूर, २५ ऑक्टोबर - अनिष्ट रूढी व परंपरांचा त्याग करून नवीन उपक्रम हाती घेतल्यास सामाजिक परिवर्तन होण्यास हातभार लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व प्रबोधनकारी संत यांच्या शिकवणीचा दाखला देऊन शेंडे बंधूंनी आईच्या इच्छेनुसार देहदान करून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात केली आहे. ही कृतिशील परिवर्तनाची नांदी असत्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.
ग. ल. शेंडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्व. सुमनताई शेंडे आदरांजली कार्यक्रमात 'देहदान व नेत्रदानाचे महत्त्व' या विषयावर ज्ञानेश्वर रक्षक बोलत होते. या कार्यक्रमास सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामभाऊ आंबुलकर, गडचिरोलीचे वनरक्षक डॉ. किशोर मानकर, सुभाष डोंगरे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, प्राचार्य संध्या राजूरकर उपस्थित होते. यावेळी डॉ. दीपाली ओंकार यांनी, वैद्यकीय ज्ञान, मानवी शरीराचे ज्ञान, प्रात्यक्षिकांमुळे ज्ञानामध्ये भर, वैद्यकीय शिक्षण संशोधन व इतर ज्ञान डॉक्टरांना कळावे. यासाठी कार्यशाळेमध्ये देहाची आवश्यकता असते असे सांगितले. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रचारक हरीश देशमुख यांनी देहदानाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे बळीराजा संशोधन केंद्रास प्रबोधनकार ठाकरे सत्यशोधक संस्थात्मक दहा हजार रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. यासोबतच शैल जैमिनी- कडू, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, तर युवा सामाजिक कार्यकर्ते किरण गेडाम यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सुशील मेश्राम यांनी केले. आभार संशोधन शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमलाकर हुडके, योगेश पोहाणे, स्वाती शेंडे, नितीन कदम, प्रकाश घोंगे, संजय ठाकरे, नंदिनी शेंडे, कीर्ती शेंडे, निर्मिती शेंडे यांनी परिश्रम घेतले.