नागपूर : सामाजिक कार्यकर्त्या व नाट्य कलावंत शैलताई जैमिनी-कद्र यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सत्यशोधक तर असंघटित कामगार व गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे यांना 'नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाया बळीराजा संशोधन केंद्र नागपूर या केंद्रास प्रबोधनकार ठाकरे सत्यशोधक संस्थात्मक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग. ल. शेंडे गुरुजी स्मृति प्रतिष्ठानतर्फे अयोध्यानगर येथील साई मंदिर सभागृहात आयोजित स्मृतीशेष सुमनताई शेंडे आदरांजली कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासोबतच युवा सामाजिक कार्यकर्ते किरण गेडाम यांना महात्मा जोतीराव फुले सत्यशोधक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वर रक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात डॉ. दीपाली ओंकार, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रचारक हरीश देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप खोडके, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामभाऊ आंबुलकर, वनसंरक्षक गडचिरोली डॉ. किशोर मानकर, सुभाष डोंगरे, कमलाकर हुडके, योगेश पोहाणे, स्वाती शेंडे, नितीन कदम, प्रकाश घोंगे, संजय ठाकरे, नंदिनी शेंडे, कीर्ती शेंडे, निर्मिती शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.