तीर्थपुरी - हजारों वर्षापासून इथल्या बहुजन समाजाला अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ठ रूढी व परंपरा मध्ये जखडून ठेवण्याचे काम इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेले आहे. त्यातूनच बहुजनांना व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्याचे काम या मनुवादी व्यवस्थेने केलेले होते त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन क्रातीसुर्य महात्मा जोतिराव फुले माता सावित्रीमाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढन शिक्षण देण्याचे काम केले मग शिक्षणाची देवी सरस्वती कशी असू शकते...? त्यामूळे सरस्वती देवी ऐवजी शिक्षणाच्या खऱ्या देवता सावित्रीमाई फुले यांचेच पूजन करायला हवे असे मत ओबीसी व बहुजनांचे राष्ट्रीय नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्यानंतर संविधान विरोधी मंडळींनी भुजबळांवर आगपाखड करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम बहुजन समाज कदापीही खपवून घेणार नाही.
आज बहुजन समाज जागृत झालेला आहे. त्याला खरे आणि खोट्याची पारख कळालेली आहे. सर्वांना माहित आहे की जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनीच मुलींची पहिली शाळा काढून महिलांना शिक्षण देण्याचे महान कार्य केलले आहे मग त्यांची पूजा केल्याने मनुवादी व्यवस्थेच्या पोटात गोळा उठण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी विनाकारण आगपाखड करून घेऊ नये असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. तसेच सरस्वती देवीने बहुजनांच्या व महिलांच्या शिक्षणासाठी कधी काही ठोस कार्य करून दाखवले का...? हे या मनुवादी विचारांच्या लोकांनी पुराव्यासकट सांगावे असे मत सुद्धा नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. देशातील व राज्यातील बहुजन समाज छगन भुजबळ यांच्या पाठीशी ठाम असून भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार येथून पुढे बहुजन समाज सरस्वती ऐवजी सावित्रीमाई फुले यांचीच पूजा करणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावर कुणाला त्रास होऊन भुजबळ यांना अंडाशेलमध्ये पाठवण्याची जर भाषा होत असेल तर त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून त्यांची जागा दाखवून देऊ व असे षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाहीत असा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे.