सावित्रीमाई, सरस्वतीबाई व भुजबळसाहेब (उत्तरार्ध)

लेखक - प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88301 27270

    भुजबळसाहेबांच्या सरस्वतीविरोधी वक्त्यव्याचे स्वागत करावे व त्यांच्या पाठीशी उभे राहून पुरोगामी चळवळ मजबूत करावी, अशी भुमिका मी लेखाच्या पुर्वार्धात मांडलेली आहे, ती काहींना विसंगतीपूर्ण वाटेल, हे मला माहीत आहे. कारण याच पूर्वार्धात मी भूजबळ हे गणतीभक्त व रामभक्त आहेत, हेही लिहीलेले आहे. आणी तरीही भुजबळसाहेबांच्या पाठीशी उभी राहिले पाहिजे, असे मी म्हणतो. याचे मुख्य कारण हे आहे की आपली पुरोगामी चळवळ प्रबोधन करायला पुरेशी सक्षम नाही. आपल्या पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंत व विद्वान फर्डे वक्ते ब्राह्मणी प्रतिकांविरोधात लिहीत असतात व बोलतही असतात, मात्र ब्राह्मणी मिडिया त्याची साधी दखलही घेत नाही, व आपल्याला अपेक्षित व्यापक चर्चाही घडून येत नाही. मात्र एखादा राजकीय नेता अथवा सिलेब्रिटि जेव्हा ब्राह्मणवादाविरोधात बोलतो, तेव्हाच मिडिया त्याची दखल घेतो व आपल्याला अपेक्षित प्रबोधनात्मक चर्चा घडून येते. अमोल मिटकरी हे आधी आपल्या भाषणातून ब्राह्मणांच्या विरोधात घणाघाती हल्ला करायचे, मात्र त्याची दखल मिडियाने कधीच घेतली नाही. परंतू ते आमदार बनल्यानंतर मिडिया त्यांच्या प्रत्येक वाक्याची दखल घेतो व अपेक्षित चर्चा घडवून आणतो.

    हे राजकिय नेते व सिलीब्रिटी ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेले असल्याने त्यांनी सतत ब्राह्मणी भुमिकाच घ्यावी, असे सनातन्यांना वाटत असते. मात्र हे नेते व सिलिब्रिटी बहुजन समाजातून आलेले असल्याने त्यांची जातजाणीव वा जातनेणीव अचानक कधीतरी उफाळून येते व ते ब्राह्मणशाहिविरोधात बोलू लागतात. कधीकधी ब्राह्मणच यांच्या ढुंगणावर लाथा हाणतात व त्याची प्रतिक्रिया म्हणून हे राजकीय नेते वा सिलिब्रिटीज ब्राह्मणांच्या विरोधात बोलायला लागतात. अशावेळी आपण पुरोगाम्यांनी त्यांना पाठबळ दिले तर त्यांची संख्या वाढेल व ब्राह्मणी छावणीत फूट पडेल. ब्राह्मणी छावणीत फुट पाडल्याशिवाय आपली पुरोगामी चळवळ वाढत नाही, असा इतिहास आहे. ब्राह्मणी प्रतिकांविरोधात प्रबोधनाची गरज का आहे, या मुक्य मुद्द्याकडे आता आपण येऊ या!

Savitri Mai Saraswati bai Bhujbal Saheb sanskritik Sangharsh     युरोपात केवळ जमीनीच्या केंद्रीकरणातून सरंजामशाही निर्माण झाली व चर्चच्या पाठींब्याने राजेशाही मजबूत झाली. चर्चने स्वतःच हजारो एकर जमिन बळकावलेली असल्याने त्याचा या जमीनदारशाहीला पाठींबा होता. मात्र चर्चने सरंजामशाहीला भक्कम करण्यासाठी कोणतेही काल्पनिक धर्मग्रंथ वा स्मृती-श्रुती पुराणे लिहीली नाहीत. भाकडकथांच्या माध्यमातून त्यांनी जनतेवर सांस्कृतिक वर्चस्व निर्माण केले नाही. फक्त राजाला देवाचा अंश मानण्यापलीकडे दुसरे कोणतेही आदेश पारीत केले नाहीत. त्यामुळे तेथील सरंजामशाही भौतिक पातळीवरच राहीली, मानसिक-अध्यात्मिक पातळीवर संस्कारस्वरूपात ती रुजलीच नाही. म्हणुनच तेथील जमीनदारशाही नष्ट करण्यासाठी केवळ भौतिकवादी भांडवली लोकशाही क्रांती करावी लागली.

    तरीही युरोपात जुन्या रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी चर्चच्याविरोधात महाप्रबोधनाची चळवळ राबवावी लागली. परंतू ही महाप्रबोधनाची चळवळ करीत असतांना तेथील क्रातीकारकांना फार प्राचिन काळातील गडे मुडदे उखडण्याची गरज भासली नाही. भारतातही जर केवळ जमिनदारांची सरंजामशाही राहीली असती तर आपण वर्णव्यवस्था-अंतानंतर सरळ वर्गव्यवस्थेत प्रवेश केला असता, जातीव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. परंतू ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक सूत्रबद्ध पद्धतीने प्रदिर्घ कार्यक्रम आखून पुराणे लिहिलित. ती वेगवेगळ्या विधी-कर्मकांडाच्या माध्यमातून घरोघर जावून वारंवार वाचून दाखविलीत. शूद्रादि अतिशूद्रांच्या प्रत्येक गल्ली-बोळात जाउन कथा, प्रवचने, भजन, किर्तने करून संस्कारस्वरुपात बिंबवलीत. या महा-कुप्रबोधनातुन त्यांनी ब्राह्मणी वर्चस्व निर्माण केले व बुद्धाला पराभूत करीत जातीव्यवस्था निर्माण केली.

    वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी एकिकडे बुद्दाला गुलामगिरीविरूध्दचा पंचधम्म राबवावा लागला. हा भौतिक पातळीवरचा लढा होता. ब्राह्मणी वर्चस्वाला वैज्ञानिक व तार्कीक प्रश्न उपस्थित करून निरूत्तर केले. हे मानसिक पातळीवरचे महाप्रबोधन भिक्खु संघाने सतत चारिका करून घरोघरी पोहोचविले. पुष्यमित्राच्या राजकीय प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणांनी कुप्रबोधनाची महाचळवळ राबवीली व सांस्कृतिक प्रतिक्रांती घडवून आणली. या सांस्कृतिक प्रतिक्रांतीतून ब्राह्मणी वर्चस्व निर्माण केले व राजेशाहीवर अंकूश निर्माण केला. राजेशाहीने जमीनीचे केंद्रीकरण करून जमीनदारशाही निर्माण केली. विविध कायदे करून जातीव्यवस्था निर्माण केली व भक्कमही केली. वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था या दोन्ही समाजव्यवस्था मानसिक व भौतिक पातळीवर भक्कम केलेल्या असल्याने त्याविरोधात एकाचवेळी मानसिक पातळीवरचा सांस्कृतिक प्रबोधनाचा लढा व भौतिक पातळीवरचा जमीनी लढा करावा लागतो. हा मुख्य फरक वर्गव्यवस्था व वर्ण-जातीव्यवस्था या दोन समाजव्यवस्थेत आहे.

    पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाच्या प्रदिर्घ सरकारने जमीनीचे फेरवाटप करणारी भौतिक क्रांती केली, मात्र ज्या जातीव्यवस्थेवर जमीनदारशाही उभी आहे, त्या जातीव्यवस्थेविरुध्द प्रबोधनाची सांस्कृतिक चळवळ केलीच नाही. जातीच्या यक्षप्रश्नाकडे दुर्लक्ष्य केल्याने प. बंगालमधील कम्युनिस्ट पक्षाला ब्राह्मणी संघ-भाजपाने व ममताने गिळून टाकले आहे.

   तामीळनाडूमधील डी.एम.के. पक्षाने तात्यासाहेब महात्मा फुलेंचे अब्राह्मणी तत्वज्ञान स्वीकारले. या पक्षाने केवळ अब्राह्मणी प्रबोधन चळवळ राबवून सांस्कृतिक क्रांती केली व प्रदिर्घ काळासाठी सत्ता मिळवीली. मात्र जमीनीच्या फेरवाटपासारखे भौतिक कार्यक्रम न राबविल्याने तेथील जातीव्यवस्था अजूनही जिवंत आहे. ही जातीव्यवस्था केव्हाही संघभाजपाला बळ देऊ शकते व जातीविरोधी डी.ऐम.के. पक्षाला खतम करू शकते.

    महाराष्ट्रात तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने गुलामगिरी, शेतकर्‍याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म आदि ग्रंथांच्या माध्यमातून मानसिक पातळीवर जातीव्यवस्थाविरोधी अब्राह्मणी सांस्कृतिक क्रांतीची सुरूवात केली. समतावादी बळीराजा व कुळवाडी कुळभूषण शिवाजी राजा ही पौराणिक व ऐतिहासिक प्रतिके उभी करून त्यांनी हा जात्यंतक सांस्कृतिक संघर्ष अधिक तीव्र केला. त्याचवेळेस शेतकरी संघटना व कामगार संघटना उभारून जाती-वर्गव्यवस्थेविरुध्दचा भौतिक पातळीवरचा जमीनी लढाही सुरु केला. या दोन्ही चळवळींना पुढील काळात सातत्य मिळाले असते तर तामीळनाडूच्या आधीच येथे महाराष्ट्रात जात्यंतक भांडवली लोकशाही क्रांती झाली असती व ओबीसी-बहुजनांच्या नेतृत्वाखालील राजकिय पक्ष सत्तेत दिसला असता.

    महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीला प्रदिर्घ सातत्य मिळाले असते तर येथे ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली नसती. परंतू महाराष्ट्रातील मराठ्यांनी जातीस्वार्थासाठी सत्यशोधक चळवळीचे सातत्य खंडित केले व ब्राह्मणी कॉंग्रेसला शरण जावुन ब्राह्मणी प्रतिक्रांती घडवून आणली. आज जी फडणवीसांची पेशवाई दिल्लीपर्यंत मजल मारीत बहुजनांच्या डोक्यावर मिर्‍या वाटत आहे, त्याचे पाप मराठ्यांच्या माथ्यावर आहे. आश्चर्य हे आहे की, आपल्या माथ्यावरचा हा कलंक मोठ्या गौरवाने मिरविला जातो आहे, आजच्या मराठ्यात असा एकही विद्वान वा विचारवंत नाही की जो हा कलंक पुसून टाकण्याचा साधा विचार मनात आणील. सगळे मराठे जातस्वार्थाने आंधळे झालेले आहेत.

    आज ब्राह्मणी प्रतिक्रांतीने तामीळनाडूचा अपवाद वगळता संपूर्ण देश पादाक्रांत केलेला आहे. त्यांचे ब्राह्मणी सांस्कृतिक कुप्रबोधानाचे वादळ इतके व्यापक व गतिमान आहे की या वादळाने सर्वच राजकीय पक्षांना गुंडाळलेले आहे. सर्वच राजकीय पक्षांना गणपती, रामाची व परशूरामाची भक्ती करावी लागते आहे. शंबुक, कर्ण, एकलव्याची भुमिका घेणारा एकही पक्ष त्यांनी शिल्लक ठेवला नाही. पक्षच काय व्यक्तीही शिल्लक ठेवायला ते तयार नाहीत. सर्वच दलित+ओबीसी+आदिवासी+मराठा जातीतील राजकीय नेत्यांना भाजपामध्ये जाण्याची घाई झालेली आहे. मानसिक पातळीवरचे हे कुप्रबोधन करीत असतांना जातीव्यवस्थेचा आर्थिक आधारही ते मजबूत करीत असतात. देशातील संपत्तीचे खाजगीकरण म्हणजे केंद्रीकरणच आहे. त्यातून ते जातीव्यवस्था मजबूत करणारे ब्राह्मण बनिया मक्तेदार भांडवलदार तयार करीत आहेत. कामगारविरोधी व शेतकरीविरोधी कायदे करून शूद्रादि अतिशूद्रातून पेशवाइसारखे वेठबिगार निर्माण केले जात आहेत. लॅटरल एन्ट्रीने प्रशासनातील ब्राह्मणी वर्चस्व 100 टक्के करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तामीळनाडूत ब्राह्मण पुजार्‍यांविरोधात कायदे राबविले जात असतांना दुसर्‍या अनेक राज्यात ब्राह्मण पुजार्‍यांना विशेष दर्जा देणारे कायदे केले जात आहेत.

    अशा परिस्थितीत ओबीसी, दलित व आदिवासी जातितील पुरोगाम्यांची जबाबदारी वाढलेली आहे. जेव्हा काळाकुट्ट किर्रर अंधार सर्वत्र पसरलेला असतो तेव्हा एक छोटीशी पणतीही त्या भयावह अंधाराला नष्ट करीत असते. आपण राजकीय लोकशाहीत राहात आहोत. याच राजकीय लोकशाहीचा गैरवापर करीत ब्राह्मणी प्रतिक्रांती झालेली आहे. म्हणून ही प्रतिक्रांती नष्ट करून समतावादी अब्राह्णी क्रांती करायची असेल तर आपल्यालाही राजकीय लोकशाहीचा आधार घेत नव्या क्रांतीकारक भुमिका घेणारा पक्ष स्थापन करावा लागेल. ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना करून आम्ही ती सुरूवात केलेली आहे. एक छोटीशी पणती आम्ही पेटविलेली आहे. अशा अनेक पणत्या येऊन मिळाल्या तर लोकशाही पद्धतीने आपण ही ब्राह्मणी पेशवाई उलथून टाकू शकतो व समतावादी बळीचे राज्य आणू शकतो.
जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!

(लेखक हे गेल्या 40 वर्षांपासून ओबीसी चळवळीत सक्रीय आहेत)

लेखक- प्रा. श्रावण देवरे
संपर्क मोबाईल- 88 301 27 270
ईमेल- s.deore2012@gmail.com

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209