लेखक - प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88301 27270
लोकशाहीच्या राजकीय व्यवस्थेत वाद, विवाद व संवादाला भरपूर वाव असतो. प्रसंगानुसार वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत राहतात व त्यावर अनेकांगी चर्चा होउन तो मुद्दा अधिक ठळक व मजबूत होत असतो कींवा खिळखिळा होऊन चर्चेतून बाद होतो. त्यामुळे चर्चा करून प्रश्न सोडविणे अथवा चर्चा करून सामंजस्याने मतांतर घडवून आणणे हा लोकशाहीचा मुख्य गाभा मानला गेलेला आहे. केवळ चर्चाच नव्हे तर चर्चा करता करता आपला मुद्दा अधिक संघटितपणे मांडण्यासाठी शांततामय मोर्चे आंदोलनाचे शक्तीप्रदर्शन केले जात असले तरी ते लोकशाही व्यवस्थेला मान्य आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या मताला विरोध करण्यासाठी कोणी मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काहिही कारण नाही. उलट आपला विरोधक छुपा न राहता उघडपणे आपल्यासमोर मुद्दा घेउन उभा आहे, याबद्दल त्याचे स्वागतच झाले पाहिजे.
समाजमाध्यमांमध्ये व इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये बर्याच मुद्द्यांवर अनेकांगी चर्चा झाली आहे, सुरू आहे, त्यामुळे तेचतेच मुद्दे उपस्थित करून मी या लेखाचा विस्तार करू इच्छित नाही. फक्त काही महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित केले गेले आहेत, तेवढ्याच वैचारिक मुद्द्यांवर आपण येथे चर्चा करणार आहोत.
आर्थिक वा राजकिय मुद्द्यांवर ज्या हिरिरिने राजकिय पक्ष तुटून पडतात, तेवढ्या गांभिर्याने सांस्कृतिक व सामाजिक मुद्द्यांवर लढणारा एकही पक्ष ना महाराष्ट्रात आहे, ना भारतात! याला अपवाद आहेत तो फक्त तामीळनाडूचा डी.एम.के. पक्ष! मंडल आयोग व ओबीसी जनगननासारख्या सामाजिक मुद्द्यांवर काही प्रमाणात उत्तरेतील लालू, मुलायमचे राजकीय पक्ष गंभीर आहेत, परंतू सांस्कृतिक मुद्द्यांवर हे पक्ष परशुराम व रामचरणी लीन होतात व प्रतिगामी भुमिका घेऊन संघ-भाजपालाच बळ पुरवतात.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेस याला अपवाद नाही. हा पक्ष पुरोगामी असल्याचा खूप आव आणतो. पक्षनेते शरद पवार कसे पुरोगामी आहेत, याच्या अनेक आख्यायिका रंगविल्या जातात. त्यासाठी त्यांचा सत्यशोधक वारसाही सांगीतला जातो. हा वारसाच मुळात कीती व कसा ठिसूळ आहे, हे मी 7 ऑगस्ट व 8 ऑगस्ट 2022 रोजी लिहिलेल्या दोन लेखांमध्ये सिद्ध केलेले आहे. पक्षसंस्थापक शरद पवार हे सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांवर बोटचेपी भुमिका घेतात, हे अमोल मिटकरीप्रकरणातही सिद्ध झालेले आहे. आपल्या पक्षाला पुरोगामी म्हणण्याचा नाद करायचा आणी आपल्याच पक्षातील एखादा पुरोगामी नेता तशी भुमिका घ्यायला लागल्यावर त्याला तोंडघशी पाडायचा! छगन भुजबळांची सरस्वतीबाईबद्दलची भुमिका व्यक्तीगत आहे, पक्षाची ती भुमिका नाही, असा खुलासा करून ब्राह्मणी सनातन्यांना चुचकारणे चालू ठेवायचे, असा हा दुटप्पीपणा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पुरोगामी भुमिका घेणारे सर्वच नेते हे शूद्रादी अतिशूद्र आहेत व पक्षातील त्यांचे स्थान गुलामापेक्षा वेगळे नाही. या पक्षातील भिडे गुरूजीचे भक्त असलेले सर्वच नेते हे सरंजामदार मराठा जातीयवादी असून पक्षातील त्यांचे स्थान मालकापेक्षाही मोठे आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वैचारिक संघर्ष होतच नाही. फक्त विविध समाजघटकातील मत-पेढ्या पक्षाच्या पदरात पाडून घेण्यासाठी पक्षाला पुरोगामी मुखवटा चढविण्याचा हा प्रयत्न असतो. त्यामुळे लुटुपुटुची लढाई लढण्यासाठी भुजबळ, मिटकरीसारख्यांची दोरी थोडी ढिली केली जाते व नंतर त्यांना दोरी ओढून टाईटही केले जाते. या अशा स्वार्थी राजकारणाच्या लढाईत शेवटी ब्राह्मणी सनातन्यांचा विजय होतो व पुरोगामी चळवळीचे नुकसान होते.
स्वतः भुजबळ हे पुरोगामी आहेत काय? तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या नावे समता परीषद स्थापन करून त्यांनी ओबीसी वोटबँक मराठ्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेली आहे. त्या समता परीषदेत ना समता आहे, ना फुले! जेव्हा जेव्हा मंत्रीपद मिळते, तेव्हा तेव्हा भुजबळांना सर्वप्रथम सिद्धीविनायकाची आठवण होते. नंतर कुणीतरी त्यांना फुलेवाड्याची आठवण करून देतो, तेव्हा ते फुलेवाड्यावर जाउन माथा टेकतात. भुजबळसाहेबांच्या घरात अनेक लग्ने पार पडलीत. किमान एकतरी लग्न सत्यशोधक पद्धतीने झाले आहे काय? त्यांच्या घरातील सर्वच विधींमध्ये वैदिक ब्राह्मण कसा ?
स्वतःला बौद्ध म्हणविणारे काही विचारवंतही या सांस्कृतिक संघर्षात कसे गोंधळतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवाकर शेजवळकर! हे प्रातिनिधिक उदाहरण समजावे! कारण बरेच बौद्ध त्यांच्या मुद्द्यांच्या जवळपास फिरकत असतात. दिवाकर साहेबांचा असा प्रश्न आहे की, भुजबळांना अपेक्षित असलेल्या धृवीकरणात आपला बहुजनांचा फायदा काय? प्रत्येकवेळी या विचारवंतांना नव्याने फुलेवाद व आंबेडकरवाद समजावून सांगावा लागतो, याचेच दूःख वाटते. फुलेवाद व आंबेडकरवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे, जातीव्यवस्थाअंताचे! जातीव्यवस्था भौतिक पातळीवर नष्ट करायची असेल तर जमिनीच्या फेरवाटपासारखे भांडवली लोकशाही क्रांतीचे कार्यक्रम हाती घ्यावे लागतील व मानसिक पातळीवर जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर तुम्हाला रामायण-महाभारतासारखे सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन समाजावरील ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करावे लागेल. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी शेतकरी संघटना व कामगार संघटना उभारून वर्ग-जातीव्यवस्थेविरुध्द भौतिक लढा उभा केला व मानसिक पातळीवरचे ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करण्यासाठी ब्राह्मणी-अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष उभा केला. त्यासाठी त्यांना भारताच्या जात्यंतक एतिहासिक भौतेकवादाचे मॉडेल ‘‘गुलामगिरी’’ ग्रंथ लिहून सिद्ध करावे लागले.
तात्यासाहेब महात्मा फुलेंचा हा धडा तंतोतंत गिरविला शिष्य बाबासाहेब आंबेडकरांनी! बाबासाहेबांनी खोतीच्या विरोधात बील मांडून जातीव्यवस्थेच्या विरोधात भौतिक लढा पुकारला व राम-कृष्णाविरोधात रिडल्स सारखे ग्रंथ लिहून मानसिक पातळीवरच्या सांस्कृतिक संघर्षाचा मार्गही दाखविला. खुद्द बौद्ध वाङमयातूनही सांस्कृतिक संघर्ष समजावून घेता येतो. ब्राह्मणी तुलसीदासाचे रामायण व बौद्ध रामायण यातील संघर्ष नेमका काय आहे? ब्राह्मणी रामायणात सीता ही रामाची बाहेरून आणलेली पत्नी दाखविली जाते, मात्र बौद्ध रामायणात सीता ही रामाची बहिण दाखविलेली आहे. यावरून हा संघर्ष समतावादी मातृसत्ताक समाजव्यवस्था व विषमतावादी पुरूषसत्ताक समाजव्यवस्था या दोघा समाजव्यवस्थेतील आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी रिडल्स ग्रंथ लिहून हा सांस्कृतिक संघर्ष शंबुकापर्यंत नेला.
तुम्ही रामायण-महाभारत खरे माना अथवा खोटे माना! तुम्ही परशूराम, सरस्वती, शंबूक, एकलव्य, रावण सारखी पौराणिक प्रतिके माना अथवा नका मानू! या पुराणकथा व त्यातील मिथके तुम्हाला त्या प्राचीन काळातील समाजव्यवस्था समजावून सांगतात व त्या काळातील समतेसाठी चाललेला संघर्षही उजागर करून सांगतात. सर्वसामान्य जनतेच्या मनात समता-संघर्षाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी तुम्हाला रामविरुध्द शंबूक-रावण, कृष्णविरुध्द कर्ण, द्रौणाचार्यविरुध्द एकलव्य या प्रतिकांचा सांस्कृतिक संघर्ष समजावून सांगावाच लागतो. त्याशिवाय बहुजनांच्या मनातील राम-परशुराम सारखी ब्राह्मणी प्रतिकांचे संस्कार नष्ट होणार नाहीत. प्रतिकांच्या संस्कारातूनच ब्राह्मणी वर्चस्व निर्माण होत असते व ब्राह्मणी वर्चस्वातूनच जातीव्यवस्था निर्माण झाली व भक्कमही झाली.
त्यामुळे सांस्कृतिक संघर्षाची भाषा भुजबळसाहेबांनी कोणत्याही हेतुने केलेली असली तरी त्यातुन पुरोगामी चळवळ भक्कम करण्याचे काम फुलेआंबेडकरवाद्यांनी केले पाहिजे व भुजबळसाहेबांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे.
या लेखाचे बाकिचे मुद्दे उद्याच्या उत्तरार्धात पाहू या, तोपर्यंत जय जोती, जयभीम, सत्य कि जय हो!
(लेखक हे गेल्या 40 वर्षांपासून ओबीसी चळवळीत सक्रीय आहेत)
लेखक- प्रा. श्रावण देवरे
संपर्क मोबाईल- 88301 27270
ईमेल- s.deore2012@gmail.com