कळमेश्वर, ता. ११ तालुक्यातील आलेसूर गाव. लोकसंख्या दोनशेच्या आत, गावात बहुजन समाजांची घरे. पण हे गाव सद्या जिल्ह्यात सद्या चर्चेला आले आहे. कारण काय तर क्रांतिकारी व आगळावेगळा असा नवरात्र उत्सव साजरा करण्यात गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. या उत्सवातून तरुणांनी सर्वांचे प्रबोधन घडवून आणले.
सद्या गावात माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, राणी झलकारीबाई, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, कल्पना चावला, सत्यभामा सोनेकर, फातीमा शेख अशा कर्तृत्वान महान स्त्रीयांच्या सामाजिक कार्यावर प्रबोधन करुन नऊ दिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने क्रांतिकारी उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. आलेसूर हे भारतातील असे एकमेव गाव आहे, जिथे मातीची दुर्गा
देवी न बसविता नऊ महान स्त्रीयांचे फोटो लाऊन नऊ दिवस प्रबोधन, क्रांतिकारी उत्सव साजरा केला जात आहे. कळमेश्वर तालुक्यातील आलेसूर हे छोटेसे गट ग्रामपंचायतीचे गाव आहे
आलेसूर गावात प्रामुख्याने कुणबी व माळी समाज वास्तव्य करतो. विशेष म्हणजे या गावात एकही बौध्द समाजाचे घर नाही. तरी गावात झपाट्याने परिवर्तन घडून आले. या गावातील उच्चशिक्षित युवक लोकेश मस्के, देवीदास मोहरले, समोर मस्के, पायल सोनटक्के, वैशाली तुलने, वैष्णवी शेंडे हे ओबीसी समाजातील तरुण, तरुणी आंबेडकरी विचारधारेशी जुळले आणि हा आगळावेगळा क्रांतिकारी ऐतिहासिक उत्सव सुरु केला. आलेसूर हे गाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिले गाव आहे, जिथे कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता, गरबा दांडिया न खेळता, उपवास न ठेवता येथील ओबीसी समाज प्रबोधनातून जागृत झाला आहे.
आलेसूर गावात प्रबोधन शिबीर घेण्यात आले. या प्रबोधनातून आंबेडकरी विचार घराघरात पेरला. येथील तरुण, तरुणींनी सामाजिक विचार कृतीतून स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे तरुण पाईक झाले. भारतीय संविधान पुढे ठेवून सामाजिक परिवर्तनासाठी सुसज्ज झाले. या दरम्यान नऊ क्रांतीकारी स्त्रीयांवर परिसंवाद ठेवण्यात आला. कवि संमेलनात गझलकार विनोद बागडे (वरुड), कवी गोपाल पाटील, मानेराव (वरुड) यांनी सहभाग घेऊन प्रबोधनात्मक क्रांतिकारी कविता सादर केल्या. संचालन रेडिओ सिंगर अरुण सहारे यांनी केले. हा नवरात्रीचा कार्यक्रम नऊ दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत चालेल.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan