नाशिक, ता. २० : या देशात अगदी प्राचीन काळापासून मनुवादाची नियमावली लागू होती. तिचा प्रभाव आजही समाजमनावर आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही आली असे आपण मानत असलो, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन समाजधुरिणांना अपेक्षित असलेली सामाजिक लोकशाही अद्याप या देशात रुजलेलीच नाही. असे प्रतिपादन लेखिका प्रा. डॉ. समिना दलवाई यांनी येथे केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासह विचारवंतांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला होणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे १०५ वे पुष्प प्रा. डॉ. दलवाई यांनी मंगळवारी (ता. २०) गुंफले. त्यावेळी त्या 'आजची पिढी, परिघाच्या आतील, परिघाच्या बाहेरील' या विषयावर बोलत होत्या. राष्ट्र सेवादल आणि एन. ए. पी. एम. या संघटनांतर्फे हे व्याख्यान झाले. आयोजक संघटनांच्या वतीने महेंद्र नकिल व जावेद शेख व्यासपीठावर होते. व्याख्यानमालेच्या समन्वयक श्यामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवीत असताना यापुढे प्रत्येक महिन्यात नियोजित वक्त्यांना विविध महाविद्यालयांत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशीही त्यांचा संवाद घडवून आणला जाईल. तसेच, आतापर्यंत झालेल्या सर्व व्याख्यानांचे डॉक्युमेंटेशन, दिवाळी अंक, पुस्तक आदी स्वरूपांत प्रकाशन करण्यात येईल, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. अर्चना तोंडे यांनी सूत्रसंचालन व परिचय करून दिला. प्रा. डॉ. दलवाई म्हणाल्या की, 'आजची पिढी, परिघाच्या आतील, परिघाच्या बाहेरील हा विषय समजून घेताना सुरवातीला परीघ काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्या अनुषंगाने या देशात केवळ राजकीय लोकशाही आहे. त्याऐवजी सामाजिक लोकशाही रुजविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्याच बरोबर मनुवादाचा पगडा झुगारून देण्यासाठी आपण आजही प्रयत्न करताना दिसत नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan