नागपूर : ओबीसी आरक्षणासंदर्भात विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या समर्पित आयोगाला निवेदन देण्यासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. इंपीरिकल डाटा हा गाव, तालुका, जिल्हा व शहर पातळीवरील प्रशासकीय संस्था व प्रशासकीय अधिकारी-व्यक्तींकडून अधिकृतपणे मिळू शकतो. सामाजिक संघटना व सामाजिक व्यक्तींकडून निवेदन गोळा करून इंपीरियल डाटा मिळवता येणार नाही. बीडीओ, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हापरिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती नगरपालिका, महानगरपालिका आयुक्त यांना प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून हा इंपीरिकल डाटा अधिकृतपणे व अचूकपणे मिळू शकतो. महाराष्ट्र राज्याच्या समर्पित आयोगाने मध्यप्रदेश सरकारच्या आयोगाला भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊन तयार केलेला अहवाल अभ्यासला पाहिजे व त्यांची कार्यप्रणाली समजून घेतली पाहिजे.
सर्वसमावेशक जनगणना करण्याकरिता ऑनलाईन पोर्टल तयार करावे. जेणेकरून सर्व जाती व पोटजातींबाबत आकडेवारी संग्रहित करता येईल. अशा प्रकारे निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. याप्रसंगी विजय बाभूळकर, संजय शेंडे, संजय सोनटक्के, संजय नरखेडकर, धनराज तळवेकर, नामदेव हटवार, अनील पेटकर, राजेंद्र डफरे, प्रा. रमेश पिसे, मोहन आगाशे, शंकर ढबाले, माणिकराव सालनकर, रमेश उमाठे, पुरुषोत्तम कामडी, अनील - घुसे, विनोद उलिपकर, आनंद नासरे, प्रशांत मदनकर प्रामुख्याने उपस्थित होते.