सावंतवाडी - 'बेगमपुरा' हे जातीविरोधी विचारवंतांची सामाजिक दृष्टी आहे, ते स्वप्न आहे, चळवळ आहे आणि तत्वज्ञान यांचा संगम आहे. संतानी बघितलेले स्वप्न हे दु:खमुक्त, शोषणमुक्त समाजाचे आहे. कारण स्वप्नाशिवाय तत्वज्ञान नाही आणि तत्वज्ञानाशिवाय स्वप्न नाही, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले. जनवादी साहित्य-संस्कृती चळवळीच्यावतीने सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात डॉ. गेल ऑम्वेट यांच्या 'बेगमपुराच्या शोधात' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर पुस्तकाचे अनुवादक प्रमोद मुजुमदार, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, जनवादी साहित्य चळवळीचे अध्यक्ष संपत देसाई आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांच्या 'सखी' कविता संग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.
डॉ. पाटणकर म्हणाले की, बेगमपुरा गुलामीच्या विरोधात नवा सवाल उभा करण्याची प्रेरणा देते. तत्वज्ञानाशिवायचे स्वप्न नवा समाज निर्माण करु शकत नाही. म्हणून स्वप्न आणि तत्वज्ञान यांची सांगड घालणे हा या पुस्तकाचा गाभा आहे. नवे तत्वज्ञान जन्म घेण्याची पार्श्वभूमी आहे. आपली प्रतीके निवडताना जातीविरोधी विचारवंतामध्ये उच्चस्थानी कोणाला ठेवणार ? हा सवाल हे पुस्तक करते, असे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, तत्वज्ञान भान देऊ शकत नसेल, शोधाची प्रेरणा देत नसेल तर आम्ही केवळ पोपट तयार करतो असे होईल.
तर पुस्तकावर भाष्य करताना प्रभाकर ढगे म्हणाले की, सांस्कृतिक संघर्षाची सातत्याने चाललेली परंपरा आजही थांबलेली नाही. महाराष्ट्रातील संत परंपरेची दखल ज्याप्रमाणे घेणे गरजेचे होते तेवढी घेतली गेली नाही. उजवे आणि डावे दोघेही आपापल्यापरीने या चळवळीची मापे काढताना दिसतात. सामाजिक चळवळीपुढील आव्हान हे शब्दकोश बनविण्याचे असावे. सांकृतिक संघर्षाची सातत्याने चाललेली परंपरा आजही थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. ऑम्वेट यांचे 'बेगमपुराच्या शोधात' हे पुस्तक येणे खूप महत्वाचे आहे.
तर अनुवादक प्रमोद मुजुमदार म्हणाले, भारतातील सर्वच चळवळींचा जीवन प्रवासाचा परिपेक्ष्य म्हणजे 'बेगमपुराच्या शोधात' आहे. डॉ. ऑम्वेट ह्या वैश्विक क्रांतीच्या स्वप्नांच्या प्रतिनिधी होत्या. त्यांनी भारतातील हिंदुत्ववादी इतिहास मांडण्याची परंपरा मोडीत काढली. तसेच भक्ती परंपरा केवळ आध्यात्मिक लढा नव्हता हेही जगाला दाखवून दिले.
प्रकाशन समारंभात बोलताना प्रमोद मुजुमदार, प्रभाकर ढगे आणि प्रवीण बांदेकर, डॉ. बांदेकर यांनी 'सखी' काव्यसंग्रहाचे अंतरंग उलगडून दाखवले. यावेळी ते बोलताना म्हणाले, या क्रांतीचे स्वप्न बघत जनसंघर्षात आघाडीवर असलेल्या डॉ. भारत पाटणकर या कार्यकर्त्याच्या आत एक संवेदनशील कवीही दडलेला आहे हे 'सखी' या काव्यसंग्रहातून आपल्यासमोर आले आहे. 'सखी' या संग्रहातील कविता म्हणजे रोजच्या जनसंघर्षाशी जैविकरित्या जोडून घेऊन लढणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट या आपल्या जीवनसाथीशी केलेला हा संवाद आहे. स्त्रीपुरुष समतेचा समृद्ध आशय या कवितेतून मुखर होतो हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. जनवादी साहित्य चळवळीच्या कार्याध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी स्वागत केले. महेश पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मिलिंद माटे यांनी सूत्रसंचालन तर संपत देसाई यांनी आभार मानले. यावेळी सिंधुदुर्ग आणि गोव्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan