अहमदनगर (प्रतिनिधी) - मराठी भाषा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या मुस्लिम समाजातील मराठी लेखक,कवी,व्याख्याते,शाहीर कलावंत, गझलकार आदींचे संघटन असणाऱ्या साहित्यिकांच्या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्षपदी खोकर ता.श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख यांची निवड केल्याचे पत्र ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या नोंदणीकृत (रजी. एफ.७५७३) संस्थेच्यावतीने देण्यात आले.
रज्जाक शेख यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून ते जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचे सहसंपादक या पदाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम करत आहे. त्यांच्या अकराशेपेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे.त्यांना आजपर्यंत अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. लातूर येथे ज्ञानतीर्थ पुरस्कार, नागपूरहून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुण्यातून संत एकनाथ स्मृतिगौरव पुरस्कार, अहमदनगर हून ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार, शिर्डीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाण्याहून प्रेरणा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यासारखे एकवीस शिक्षक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहे.मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता, कथा लेख, यांचे लेखन तसेच हा स्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यां जली, अष्टाक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.प्रवरा कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे पाच वेळा प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी ९ न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स, भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजाध्यक्ष ऍड हाशम पटेल, शफी बोल्डेकर,खाजाभाई बागवान, डॉ.जब्बार पटेल,अनिसा शेख, डॉ.सलीम शेख, सलीमखान पठाण, मिराबक्ष शेख, शौकतभाई शेख, अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ. दिलशाद सय्यद आदींनी अभिनंदन केले आहे.