सातारा : महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे यामागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने शनिवारी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकले नाही, असा आरोप करत सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, जान पर दांव खेलेंगे, आरक्षण लेके आयेंगे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय अशी घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. यामुळे काही काळ सातारा-कोरेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी चालू ठेवली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. मध्यप्रदेश सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत केले आहे. पण महाविकास आघाडी सरकारने आपल्या राज्यात ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे.
ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करण पोरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय नेतृत्वच तयार होऊ नये, ही भूमिका घेतली आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप ओबीसींनान्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. सरकारच्या वेळकाढूपणामुळे राजकीय आरक्षण जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आंदोलनात ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहराध्यक्ष विकास गोसावी, गीता लोखंडे, तेजस जमदाडे, सागर जाधव, निखिल झगडे, नीता पवार, सचिन घाटगे, शेखर वढणे, विक्रम बोराटे, विक्रांत भोसले, वनिता पवार, वैष्णवी कदम, वैशाली टंकसाळे, कुंजा खंदारे, संगीता जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan