पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या आरंभ काळापासून कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते रशीदभाई शेख (वय ७६) यांचे गुरुवारी मध्यरात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, सेवानिवृत्त शिक्षिका सईदा शेख, मुलगी शबाना जोगळेकर आणि नातू आर्यन असा परिवार आहे.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने रास्ता पेठ येथे चालवण्यात येत असलेल्या मुस्लीम महिला मदत केंद्राचे रशीदभाई शेख प्रमुख होते. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे खजिनदार, कार्यकारिणी सदस्य, पुणे जिल्हाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या रशीदभाईनी पार पाडल्या होत्या. गेल्या चार दशकाहून अधिक काळ त्यांनी मुस्लीम समाजप्रबोधन आणि मुस्लीम महिलांच्या प्रश्नांवर कार्य केले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
हमीद दलवाई यांच्या कार्यप्रेरणेतून मुस्लीम सत्यशोधक मंडळाशी जोडले गेलेले रशीदभाई अंतर्बाह्य प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. विचार, वर्तन आणि कार्य यांच्यात सुसूत्रता ठेवून सत्यशोधक चळवळीत ते सक्रिय होते, अशा शब्दांत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी शेख यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan