चंद्रपूर : आतापर्यंत ओबीसी महिलांना संधी मिळत नव्हती. आता फार मोठ्या प्रमाणात ओबीसी महिला लिहायला लागल्या, त्यामुळे त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. लेखन करायचे असेल तर फार मोठ्या प्रमाणात वाचन करणे आवश्यक आहे. आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे, तरीसुद्धा साहित्यिकांनी निर्भीडपणे लेखन करणे गरजेचे आहे, असे परखड मत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी व्यक्त केले. त्या फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य-संस्कृती संवर्धन समिती नागपूरच्या वतीने चंद्रपुरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित तिसऱ्या फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
मशाल प्रज्वलीत करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी जाकीर हुसेन कॉलेज दिल्लीचे डॉ. लक्ष्मण यादव, युवा नेत्या शिवानी वाडेट्टीवार, माजी संमेलनाध्यक्ष व झाडीबोली कवयित्री अंजनाबाई खुणे, राहुल खांडेकर, ज्येष्ठ समाजसेविका प्रभा वासाडे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. अँड.अंजली साळवे विटनकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दत्ता हजारे, मिलिंद फुलझेले, श्रीगुरुदेव युवा मंचचे मुख्य प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक व संमेलनाच्या मुख्य प्रवर्तक प्राचार्य संध्या राजुरकर आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर घटनेत ३४० कलम टाकले नसते तर आज ओबिसींना आरक्षण मिळाले नसते. महात्मा फुलेंच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले या खंबीरपणे उभ्या होत्या. त्यामुळे महात्मा फुले यांनी समाजसेवेच व्रत स्वीकारले. येऊ घातलेले नविन शैक्षणिक धोरण हे बहुजन समाजासाठी घातक आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार देशातील कानाकोपऱ्यात पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटन डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले. यावेळी अंजनाबाई खुणे, राहुल खांडेकर, शिवानी वडेट्टीवार, प्रभा वासाडे, मिलिंद फुलझेले, ज्ञानेश्वर रक्षक यांनीही मार्गदर्शन केले. बहुजन लेखिकेने तिच्या लेखनात क्रांतीच्या मशाली येऊ द्याव्या असा संदेश देत मान्यवरांचे स्वागत समेलनाच्या स्वागताध्यक्षा अॅड. अंजली साळवे-विटनकर केले. प्रास्ताविक प्राचार्य संध्या राजुरकर यांनी केले. संचालन डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार विलास गजभिये यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan