ओबीसी बांधवानो शांत राहा, भडकू नका व राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून कोणाचे भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत पडू नका, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विदर्भ विभागीय प्रसिद्धी प्रमुख पंकज खोबे यांनी केले आहे. राजकारणी नेतेमंडळी स्वतःच्या स्वार्थापोटी धार्मिक गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय पक्षाला फायदा होईल व मते वाढतील, याकरिता लोकांना भडकवीत आहेत. यामध्ये आपल्या ओबीसी बांधवांनी भाग न घेता जर शांत राहावे. कारण ओबीसी समाजाशिवाय कोणतेही योजना किंवा मेळावे यशस्वी होत नाही. हे त्यांना दाखवून देण्याची हीच खरी संधी आहे. असे झाले तर आपल्या ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडता येईल. राजकीय पक्षांनी नेहमी ओबीसी युवकांचा वापर केला आहे. गर्दी ओबीसींची, पैसा ओबीसींचा असे नेहमीच झाले. मात्र ज्यावेळी ओबीसी जनगणनेचा विषय येतो, केंद्रात ओबीसी मंत्रालयाचा विषय येतो, ओबीसींचा रोजगाराचा विषय येतो, ओबीसींचा न्याय, हक्क, अधिकार व मागण्यांचा विषय येतो, तेव्हा मात्र हे विशिष्ट पक्षातील राजकारणी दुर्लक्ष करतात. त्यामुळे आता ओबीसींनी सावध होणे आवश्यक आहे. राममंदिर, हनुमान चालीसा, बाबरी मशीद, नमाज, प्रार्थना या प्रकरणात नेहमी ओबीसी युवक पुढे राहिले आहे. मात्र ओबीसींच्या हक्काचा विषय आला तेव्हा मात्र धर्माचे राजकारण करणारे स्वार्थी राजकारणी नेहमीच ओबीसींना डावलत आले आहे. म्हणून यावेळी ओबीसी युवकांनी भोंगे लावण्याच्या व काढण्याच्या भानगडीत न पडता अलिप्त राहावे. ओबीसी शिवाय राजकारणी आंदोलन यशस्वी करू शकत नाही, असेही पंकज खोबे यांनी पत्रकात म्हटले आहे.