कामठी - ओबीसींनी आपले हक्क, अधिकार आणि ओबीसी जनगणना व्हावी यासाठी जाती धर्माचा विचार न करता संविधानिक हक्क मिळण्यासाठी एकजुट व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तालुक्यातील गादा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर जिल्हा अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे ओबीसींचे उद्धारक आहेत, असे मत व्यक्त करीत धर्माच्या नावावर विभाजित न होण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ सात वर्षांपासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशभर अधिवेशने, धरणे आंदोलन या संविधानिक मार्गाचा अवलंब करून ओबीसींना अधिकार, कर्तव्याची जाणीव करून देत आहे. असे सांगून पटोले पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे लोटलीत. पण, ओबीसी समाजाला संविधानानुसार सोयी व सवलती मिळाल्या नाहीत. त्या मिळविण्यासाठीच ओबीसी समाजाला एकजुट होण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर शहर व ग्रामीणचे आजचे संयुक्त अधिवेशन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करून आयोजित करण्यात आले.
तत्पूर्वी नाना पटोले यांच्या हस्ते ज्योतिराव फुले, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष संघटनेचे प्रदेश महासचिव राजेश काकडे, प्रमुख पाहुणे म्हणून अधिवेशनाचे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार परिणय फुके, आमदार टेकचंद सावरकर, आमदार अॅड. अभिजित वंजारी, माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर, जि.प. सदस्य दिनेश ढोले, प्रसन्ना तिडके, शहाणे आणि ओबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येत ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan