तीर्थपुरी : समाजाला विचार देण्यासाठी व विचारांचे पुजन करण्यासाठी महापुरुषांची जयंती साजरी करावी असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते तथा समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते संतोष वीरकर यांनी केले. ते तीर्थपुरी येथे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ही काळाची गरज या विषयावर व्याख्यान देत असताना बोलत होते.यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे,नगरसेवक डॉ. प्रविण कडुकर,रमेश कासार,प्रशांत बोबडे,भगवान मापारे,जनार्धन बारवकर,प्रदिप वाजे,कैलास जारे,विठ्ठल गाडेकर,साईनाथ वाजे आदि उपस्थित होते.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान तीर्थपुरी येथे आयोजित करण्यात आले होते.उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना संतोष वीरकर पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा पुण्यातील बुधवार पेठेत सुरू केली.मात्र पेशव्याच्या वंशजांनी या बुधवार पेठेत गणिका नाचवुन बुधवार पेठेला वेश्यालय बनवले. ज्योतिबा फुले यांनी मठ मंदिर उभारण्यापेक्षा शाळा उभी करण्याला महत्त्व दिले. शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी हे कार्य केले.आम्हाला चुकीचा इतिहास आजपर्यंत शिकवण्यात आला याचे शल्य बहुजन समाजाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती फुलेंनी साजरी केली मात्र आम्हाला शाळेत शिकवले गेले की शिवजयंतीची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली,हे धादांत खोटे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त बहुजन समाजावर प्रेम केले मात्र आम्हाला सांगण्यात आले की ते गोब्राह्मणप्रतिपालक आहेत. बहुजनांच्या मुलींनी शिक्षण घ्यावे म्हणून सावित्रीबाई फुले यांनी दगड विटांचा मारा सहन केला व मुलींना शिकवले मात्र आम्हाला सांगितल्या जाते की विद्येची देवता सरस्वती आहे. महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली त्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मही झाला नव्हता मात्र शिक्षक दिन त्यांच्या नावे साजरा होतो.अशा अनेक बाबी आम्हाला चुकीच्या सांगण्यात आल्या किंवा एका विशिष्ट जातीला कायम महत्त्व देण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर,गाडगेबाबा, अहिल्याबाई होळकर,अण्णाभाऊ साठे,राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांनी जातिभेद नष्ट करून बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे मात्र त्यांना खुजे ठरवण्याचे काम काही लोकांकडून अद्यापही होते आहे. महात्मा फुले हे त्याकाळी गर्भश्रीमंत होते. सर्वात मोठे कंत्राटदार अशी त्यांची ख्याती होती.खडकवासला धरण त्यांनीच बांधले होते मात्र असे असतानाही त्यांनी आपली सर्व संपत्ती समाजाला दान केली त्यांची सून शेवटी बेवारस म्हणून तीचे अंत्यसंस्कार पुणे नगरपालिकेने केले होते अशा या महान समाजसेवकाच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपण वागले पाहिजे असे वीरकर यांनी सांगितले. या वेळी युवराज कडूकर, शंकर उढाण,अशोक गांजाळे,मुकेश प्रधान यांच्यासह फुले प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan