ओबीसी जनगणना लढ्यातील आघाडीच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ऍडव्होकेट अंजली साळवे विटनकर यांची ८ मे २०२२ ला, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली. त्यांच्यावर या नेमणुकीबद्दल ओबीसी बहुजन चळवळीतील सर्व स्तरातील संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
ओबीसी समाजात ओबीसी जनगणना या मागणीकरिता अक्षरशः रान पेटले आहे. ओबीसीची जातवार जनगणना व्हावी म्हणून अनेक ठिकाणी घरोघरी पाठी लावण्याची मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली. त्या माध्यमातून ओबीसी अस्मिता आणि ओबीसीमध्ये भान-जागृतीची प्रक्रिया अतिशय वेगाने घडत आहेत. या पाटी लावा मोहिमेची संकल्पना अंजलीताईंनी जीव ओतून ओबीसी समाजात रुजवली. ओबीसी जनगणनेची गरज खरं म्हणजे ओबीसी आरक्षण आणि एकूणच ओबीसींच्या समस्या दूर करण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. ओबीसी समाजाची काय स्थिती आहे याचे चित्र स्पष्ट करणारी आहे. ओबीसी जनगणना झाली म्हणजे ओबीसी आरक्षण संदर्भातील अनेक संवैधानिक, शासकीय, तांत्रिक, न्यायालयीन अडचणी दूर करता येणे शक्य होईल. म्हणून ओबीसी आंदोलनातून ओबीसी जनगणनेची मागणी मागील दोन-तीन दशकांपासून तीव्र होत आहे. विशेष म्हणजे ओबीसी मधील विविध संघटनांची ओबीसी जातवार जनगणनेसंदर्भात समन्वयाची भूमिका असून त्यामुळे जातवार जनगणना लढा जोर पकडत आहे. यामध्ये अंजलीताईंचे संघटनात्मक, वैचारिक, शासकीय आणि न्यायालयीन पातळीवरील कार्य लक्षणीय राहिले आहेत. ओबीसी आंदोलनाला तेवत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम साहित्यिकांचे आहे.फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अंजलीताईंचा व्यापक सहभाग त्यांचा सत्यशोधकी विचार वारसा अधिक भक्कम करणार आहे. माजी आमदार एडवोकेट एकनाथराव साळवे काका यांनी चालवलेली सत्यशोधकी परंपरा अंजलीताई समर्थपणे आपल्या खांद्यावरून पुढे नेत आहेत याचा अतिशय हर्ष होत आहे. ही परंपरा आणि प्रवाह अधिक बळकट होत असल्याचे यावरून दिसून येते. ओबीसी साहित्यिक, पत्रकार, व्यावसायिक, उच्च अधिकारी-कर्मचारी, उच्चशिक्षित, बेरोजगार, तरुण, शेतकरी, शेतमजूर, कामगार महिला असे ओबीसी समूह परस्परांशी संवादातून ओबीसी अस्मिता उजागर करत आहे. ही फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. डॉ. एड. अंजली साळवे ताईंच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नेमणूकीतून साहित्य आणि सामाजिक चळवळीचा अप्रतिम समन्वय घडून येत असून, ओबीसी चळवळीच्या भवितव्याचे हे सुमंगल सूचक असावे.