कराडात ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी आंदोलन
कराड - ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित व्हावे. तसेच ओबीसींसह सर्वांची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी ११ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत येथील तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र रेळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करून सरकारकडून समाजावर अन्याय करण्यात आला आहे. ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये ओबीसी प्रवर्गातील कराड नगरपालिकेचे नगरसेवक, तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आपल्या हक्कांसाठी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष भानुदास वास्के, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तारळेकर, कराड शहराध्यक्ष विनायक गायकवाड प्रयत्न करीत आहेत. तरी ओबीसी लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हानही संघटनेच्या वतीने सदर प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan