बदलापूर - ओबीसी आरक्षणाचा लढा ही चळवळ आहे. हा लढा पक्षासाठी नसून समाजासाठी आहे. भाजपा आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून आज ओबीसींचे आरक्षण गेले, उद्या अनुसूचित जाती-जमातींचही जाऊ शकते. त्यामुळे ओबीसी-बहुजनांनी एकत्रितपणे ही लढाई लढावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केले.
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व ओबीसींच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बदलापूरात तीन दिवसीय घोंगडी सभांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात १३ ठिकाणी या सभा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचा रविवारी (ता.२४) संध्याकाळी बेलवली येथील यशस्वीनी भवनमध्ये समारोप करण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दामले यांच्या हस्ते ओबीसी आरक्षण मशाल प्रज्वलित करण्यात आली.
ईश्वर बाळबुधे म्हणाले की, बहुजन समाज ९० टक्के असून तीन टक्केवाले राज्य करणार असतील तर त्यांना बाजूला सारावे लागणार आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, हे विसरून चालणार नाही, याची त्यांनी आठवण करून दिली. केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा न दिल्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले असून अजूनही केंद्र सरकारने हा डेटा दिला नसल्याचा आरोप बाळबुधे यांनी केला.
ओबीसी आरक्षणाचा लढा एका समाजाचा नसून तुमच्या आमच्या सर्वाच्या भवितव्याचा लढा आहे. हे समजून घ्या. आगामी काळातही या लढ्यात एक कार्यकर्ता म्हणून सदैव आपल्या सोबत राह,अशी ग्वाही आशिष दामले यांनी ओबीसी बांधवाना दिली.एका ब्राम्हण समाजाच्या मुलाने ओबीसी आरक्षणाची मशाल हाती घेतली, मशाल यात्रेला बेलवली भीमनगर येथून सुरुवात झाली, हा इतिहासच आहे आणि तो माझ्या बदलापूर शहरात घडला आहे याचा सार्थ अभिमान असल्याची भावनाही आशिष दामले यांनी व्यक्त केली.
राज्यात सध्या भाजपाची अवस्था वाईट असून आताच्या घडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपाला ५० चा आकडाही पार करता येणार नसल्याचा दावा करून कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष ठरविण्यात राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची असेल असा दावाही त्यांनी केला. घोंगडी सभांवे सर्व नियोजन केल्याबद्दल त्यांनी शहराध्यक्ष आशिष दामले व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कोकण विभाग प्रभारी राजा राजपुरकर आदींचीही समयोचित भाषणे झाली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar